अस्वच्छता : लाखो मुंबईकर करतायेत रोगांचा सामना

जागतिक स्वच्छता दिन. स्वच्छतेचे महत्व भारतीयांना कळत असले तरी वळत मात्र नाही. सव्वा कोटींच्या मुंबईत अस्वच्छतेमुळं लाखो मुंबईकरांना अनेक रोगांचा सामना करावा लागतोय. मुंबई महापालिकेक़डून याबाबत जनजागृती केली जात असली तरी याचा उपयोग मात्र होताना दिसत नाहीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 20, 2013, 11:06 AM IST

ww.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज जागतिक स्वच्छता दिन. स्वच्छतेचे महत्व भारतीयांना कळत असले तरी वळत मात्र नाही. सव्वा कोटींच्या मुंबईत अस्वच्छतेमुळं लाखो मुंबईकरांना अनेक रोगांचा सामना करावा लागतोय. मुंबई महापालिकेक़डून याबाबत जनजागृती केली जात असली तरी याचा उपयोग मात्र होताना दिसत नाहीय.
सध्या शाळेत बाराखडी शिकवण्याच्या अगोदर स्वच्छतेच्या सवयी शिकवल्या जातात. परंतु त्याचे आचरण करायचे नसते हे सभोवतालच्या अनुभवातून ते मुलं शिकते. त्यामुळंच सार्वजनिक ठिकाणी घाण कऱण्याच्या सवयी बहुतांश भारतीयांना अजूनही सुटलेल्या नाहीत. मुंबईत तर कितीही स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या तरी ठिकठिकाणचे घाणीचे साम्राज्य मुंबईकरांना नवे नाही. यामुळं मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय. केवळ टीबीचे उदाहरण घेतले तरी मुंबईत दरवर्षी ३० हजार टीबीचे रुग्ण आढळतात.
मुंबई महानगरपालिका शहरातील कचरा उचलण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करते. तर घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेचे बजेट आहे चौदाशे कोटींचे. शून्य कचरा मोहिम, स्वच्छता प्रबोधन अभियान महापालिका राबतंय. तसंच रस्त्यावर घाण करणा-या आणि थुंकणा-यांवर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शल योजना राबवली जातंय
बहुतांश भारतीयांना स्वच्छता ही दुस-यानं केलेली आवडते. त्यामुळं आपल्या देशात स्वच्छतेविषयी कितीही जागरुकता केली तरी स्वच्छतेचे कल्चर रुजण्यात वेळ लागतोय. व्यक्तिगत पातळीवर प्रामाणिक प्रयत्न झाल्यास स्वच्छता दिनासारखे उपक्रम राबवण्याची गरजही लागणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ