फिल्म रिव्ह्यू : चेन्नई एक्सप्रेस

जवळजवळ दीड महिन्यांच्या प्रमोशननंतर ईदच्या मुहूर्तावर देश-विदेशांत जवळजवळ चार हजार स्क्रीनवर ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा रिलीज झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 11, 2013, 03:21 PM IST

सिनेमा : चेन्नई एक्सप्रेस
दिग्दर्शक : रोहीत शेट्टी
निर्माता : गौरी खान, करीम मोरानी, सिद्धार्थ रॉय कपूर
कलाकार : शाहरुख खान, दीपिका पादूकोन, सथ्यराज, निकतिन धीर, प्रियमणि, मनोरम्मा, कामिनी कौशल
गीत : अमिताभ भट्टाचार्य, हनी सिंह
संगीत: विशाल-शेखर, हनी सिंह
जवळजवळ दीड महिन्यांच्या प्रमोशननंतर ईदच्या मुहूर्तावर देश-विदेशांत जवळजवळ चार हजार स्क्रीनवर ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा रिलीज झालाय. पडद्यावर काहीतरी नवीन पाहण्याच्या उद्देशानं जाणाऱ्यांची हा सिनेमा निराशा करू शकतो परंतू ‘ओम शांती ओम’नंतर जवळजवळ सहा वर्षानंतर दीपिका पादूकोन आणि शाहरुख खान या दोघांची जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर एकानंतर एक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक रोहीत शेट्टीनं या सिनेमावर जवळजवळ ऐंशी करोडोंची गुंतवणूक केलीय. पण, वसुलीबद्दल त्याला मात्र अजिबात चिंता करायची गरज नाही.
रोहीतचा बीग बजेट चित्रपट
जवळजवळ पाच वर्षांपूर्वीच रोहीत शेट्टीनं के. सुभाष यांच्या स्क्रिप्टला फायनल केलं होतं. रोहीतच्या याआधी आलेल्या प्रत्येक सिनेमाआधी त्यानं या चित्रपटाच्या निर्मितीचा विचार केला परंतु, या सिनेमासाठी लागणारा खर्च मात्र त्याला पाऊल पुढे टाकू देत नव्हता. गेल्या वर्षी रोहीतनं या महागड्या प्रोजेक्टवर एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून आणि आपला मित्र करीम मोरानी याच्यासोबत या सिनेमावर काम सुरू केलं. या सिनेमातील खास लोकेशन्स आणि सिन्स यामुळे हा सिनेमा आकर्षक झालाय.
कथानक
चाळीस वर्ष उलटलेल्या राहुलचं (शाहरुख खान) अजूनही लग्न झालेलं नाही. राहुल आठ वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला. त्याला त्याच्या आजी-आजोबांनी (लेख टंडन आणि कामिनी कौशल) यांनी सांभाळलेलं. त्यांना सांभाळण्यासाठीच राहुलनं लग्नाचा विषय मागे टाकलेला...
पण, अचानक एके दिवशी राहुलच्या आजोबांचा मृत्यू होतो आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो चेन्नई एक्सप्रेस पकडून मुंबईला रवाना होतो. चेन्नई एक्सप्रेसमध्ये राहुल आणि मीनाम्मा (दीपिका पादूकोन) यांची भेट होते. मीनाम्मा आपल्या गावाला-कोमब्नला निघालीय.
मीनाम्माला जबरदस्तीनं गावी नेलं जात असल्याचं राहुलच्या लक्षात येत नाही पण परिस्थिती असे प्रसंग उभे करते की त्यालाही तिच्यासोबत तिच्या गावी जावं लागतं. गावात आहे मीनाम्माच्या वडिलांचा म्हणजेच दुर्गेश्वरा अजहागुसुंदरम (सथ्यराज) यांचा दबदबा... आणि त्यांचा विक पॉईंट आहे बिना आईची सांभाळलेली त्यांची मीनाम्मा.
दुर्गेश्वराला शेजारच्या गावात राहणाऱ्या तांगाबल्ली (निकेतन धीर) याच्यासोबत आपल्या मुलीचा विवाह होताना पाहायचाय. यामध्येच सुरू होते राहुल आणि मीनाम्माची लव्हस्टोरी... दोघांच्याही रीतीरिवाज, भाषा, संस्कृती वेगवगळं... पण, दोघांचाही एकमेकांवर जीव जडलेला...

शाहरुखचे अॅक्शन सीन्स
शाहरुखनं पहिल्यांदाच या चित्रपटात आत्तापर्यंत विचारही न केलेले अॅक्शन्स आणि स्टंट केले असतील. या राहुलचं कॅरेक्टर थोडंफार ‘दिलवालें दुल्हनिया ले जाऐंगे’च्या राजची छाप आहे. इंटरवलपर्यंत शाहरुख कुठेतरी कमी पडतोय असं वाटत राहतं पण दीपिका मात्र आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यात यशस्वी ठरते.
दिग्दर्शन
प्रमोशनमध्ये या सिनेमाचा गाजावाज रोहीत शेट्टीचा सिनेमा म्हणून झाला पण, रोहीतच्या अगोदरच्या सिनेमांवर एक नजर टाकली तर तोही या चित्रपटात दिग्दर्शनात थोडा कमी पडलेला जाणवतो. अॅक्शन सीन्स, भन्नाट लोकेशन्स ही चित्रपटाची जमेची बाजू बाजूला काढली तर चित्रपटाची स्क्रिप्ट दणकून मार खाते.

संगीत
‘कश्मीर मैं तू कन्याकुमारी’ गाण्याचं चित्रिकरण पाहण्यासारखंच झालंय. एखादा वेगळा सिनेमा तयार करता येईल एव्हढा पैसा या एकाच गाण्यावर ओतला गेलाय... पण, गाणं एकदम पैसा वसूल... बाकिच्या इतर गाण्यांना थोडा टिपिकल साऊथ टच आहे... पण, थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर मात्र ती लक्षात राहतील की नाही याबद्दल शंका आहे. विशाल-शेखरची जोडीही यावेळी थंडच वाटते.
शेवटी काय तर...
दक्षिणेतील सुंदर सुंदर लोकेशन्स जी तुम्ही आजपर्यंत पडद्यावर पाहिली नसतील ती पाहायची असतील तर रोहीतचा हा सिनेमा तुमच्यासाठी चांगली संधी आहे... किंवा तुम्ही शाहरुखचे, दीपिकाचे आणि रोहीतचे फॅन असाल तरीही तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करू शकता.