EXCLUSIVE- रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांच्या तोंडी अर्भक!

यवतमाळ जिल्हा रुग्णालयात सध्या कुत्र्यांचंच राज्य आहे. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय यांचा नाही तर केवळ कुत्र्यांचाच वावर असतो. या मोकाट कुत्र्यामुळे एका अर्भकाचा बळी गेलाय. मात्र याचं कोणालाच सोयरसुतक नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 5, 2013, 06:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ
यवतमाळ जिल्हा रुग्णालयात सध्या कुत्र्यांचच राज्य आहे. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय यांचा नाही तर केवळ कुत्र्यांचाच वावर असतो. या मोकाट कुत्र्यामुळे एका अर्भकाचा बळी गेलाय. मात्र याचं कोणालाच सोयरसुतक नाही.
आलेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार करणं आणि त्यांची काळजी घेणं ही या रुग्णालयातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात जे काही घडलं ते पाहून कोणालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही. या रुग्णालयाच्या आवारातच एका अर्भकाचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले. अवघ्या एक ते दोन दिवसांचं हे स्त्री अर्भक होतं. रुग्णलायच्या आवारातच कुत्रे हे अर्भक तोंडात घेऊन फिरत होते. मात्र रुग्णालय व्यवस्थापन, डॉक्टर, कर्मचारी यांना त्याचं काहीही देणंघेणं नसल्याचं दिसलं. ही बाब रुग्णालय प्रशासनाला सांगण्यासाठी लोकांनी धाव घेतली, पण रुग्णालयात जबाबदार अधिकारीच हजर नव्हता. जे होते त्यांनी नेहमीचाच प्रकार असल्याचं म्हणत या प्रकाराकडे डोळेझाक केली. काळीज पिळवटून टाकणाऱा हा प्रकार बघताच काहींनी कुत्र्यांच्या तावडीतून हे अर्भक सोडवलं.
या सर्व अमानुष प्रकारानंतर अर्भकाचा दुर्दैवानं मृत्यू झाला. पण या अर्भकाचे पालक कोण, त्यांना कळवण्याची जबाबदारी कोणाची याचं भानही प्रशासनाला नाही... जिल्हा रुग्णालयात अशाच यापुर्वीही घडल्यात. रुग्णालय परिसरात ही कुत्र्यांची दहशत निर्माण होत असताना सुरक्षा कर्मचारी काय करत होते याचं उत्तर प्रशासनानं देणं आवश्यक आहे. तान्ह्या जीवाचं आयुष्य संपवणा-या या कोडग्या कारभाराला चाप कधी बसणार हा प्रश्न कायम आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.