www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे. सिंचन श्वेतपत्रिकेनंतर मंत्रिमंडळात होणाऱ्या फेरबदलच्या वेळीच हे बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘झी २४ तास’ला दिलीय.
मागील अनेक महिने चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा फेरबदल सिंचनाची श्वेतपत्रिका सादर झाल्यानंतरच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या फेरबदलाच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले अजित पवार यांचा पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर कमबॅक होणार असल्याचीही खात्रीलायक माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संबंध ताणले गेले होते. तर अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अजितदादांच्या राजीनाम्यानंतर श्वेतपत्रिका लवकर निघावी असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. ही श्वेतपत्रिका आता हिवाळी अधिवेशनात अथवा शक्य झाले तर त्या आधीही येण्याची शक्यता आहे. श्वेतपत्रिका जाहीर झाल्यानंतर राज्यमंत्रिमंडळात फेरबदल होणार असून अजित दादांचा पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती ‘झी २४ तास’च्या हाती आली आहे.