सरकारचा अजब निर्णय, कामगार उघड्यावर

सरकारच्या एका अजब निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. आजारापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे.

Updated: Oct 27, 2011, 07:33 AM IST

झी २४ तास वेब टीम, चंद्रपूर

 

सरकारच्या एका अजब निर्णयामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. आजारापेक्षा उपचार भयंकर असाच काहीसा प्रकार उघड झाला आहे.

 
चंद्रपूर जिल्ह्यातल्या औष्णीक वीज निर्मिती केंद्रांनी कोल वॉशरीजमधला कोळसा घेणं १ जुलैपासून बंद केलंय. वॉशरीजमधून येणारा कोळसा योग्य प्रतिचा नसल्याचं कारण देत सरकारनं हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळं विविध कोल वॉशरीजमधल्या सुमारे १० हजार कामगांवर बेकारीची कु-हाड कोसळलीय. यातले बहुतेक कामगार हे स्थानिक आहेत.

 

दुसरीडकं वीज निर्मिती केंद्रानं कोळसा घेणं बंद केल्यामुळं कोल वॉशरीज आणि कोळसा वाहतूकीचं काम ठप्प झालंय. त्यामुळं कामगारांना कामावर ठेवणं शक्य नसल्याचं वॉशरीजचे मालक सांगत आहेत.

 

कोळसा खाणी सराकरी, वीज निर्मिती केंद्र सरकारी, कोल वॉशरीजमधला धुतलेला कोळसा तपासणा-या यंत्रणा सरकारी आहेत. असं असतानाही सरकारी यंत्रणांच्या नाकर्तेपणाचं खापर इतरांवर फोडून कामगारांच्या रोजगारावर सरकारनं गदा आणलीय.

 

मुठभर कोल वॉशरीजच्या मालकांना वठणीवर आणण्यासाठी हजारो कामगारांना देशोधडीला लावणारा सरकारचा हा निर्णय कितपत व्यवहार्य आहे,  असा प्रश्न उपस्थित केला  जातोय.