झी २४ तास वेब टीम, मुंबई
पॉवर लिफ्टर मिलिंद ताटे या प्रतिभाववान खेळाडूने एशियन आणि कॉमनवेल्थमध्ये भारताला गोल्ड मिळवून दिल. मात्र महाराष्ट्राच्या प्रतिभावान खेळाडूची घरची परिस्थिती एवढी हालाखीची आहे की त्याला रोजच्या जेवणावर खर्चही करणं परवडत नाही. या उपेक्षित खेळाडूचं आतापर्यंतच आयुष्यच संघर्षमय ठरल आहे.
२७ वर्षीय मिलिंद ताटे याने पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र आणि भारताच अनेक मेडल्स मिळवून दिले. मिलिंदनं भारताला एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि पॉवरलिफ्टिंग कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल मिळवून देऊन त्यानं देशाच नाव उंचावलं. मात्र या प्रतिभावान खेळाडूच्या वाट्याला अगदी लहानपणापासून संघर्ष आला. त्याचा हा संघर्ष आजतागायत सुरूच आहे. लहानपणीच वडिलांच छत्र हरपलेल्या मिलिंदची आईही कॅन्सरमुळे त्याला सोडून गेली. एलफिन्स्टच्या एका छोट्याश्या घरात आपल्या दोन भावांसह राहणारा मिलिंद दुधाची विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. पुरेसा आहार घेण्याएवढीही त्याची आर्थिक परिस्थिती नाही. मात्र तरीही जिद्द आणि दृढनिश्चियी मिलिंदचा संघर्ष सुरूच आहे.
मिलिंद गोरेगावला शिवछत्रपती ऍवॉर्ड विजेते मधुकर दरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतो. दरेकर हेदेखील मिलिंदला जमेल तेवढी मदत करत असतात. सरकाकडून मिलिंदला काहीही मदत मिळत नसल्याची खंत ते व्यक्त करतात.मिलिंद ताटे सारख्या गुणवान पण उपेक्षित खेळाडूला जर वेळीच मदत मिळाली तर तो नक्कीच महाराष्ट्राच आणि देशाच नाव उज्ज्वल करेल आणि त्याचा लहानपणापासून सुरू असलेला संघर्ष संपेल.