www.24taas.com, नाशिक
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी कसं करता येईल, यासाठी शिक्षण विभागानं विशेष उपाययोजना हाती घेतल्यायत. त्याअंतर्गत भरारी पथकं अचानक शाळेत जाऊन विद्यार्थ्याचं दप्तर तपासणार आहेत.
विद्यार्थ्यांचं ओझ्यानं भरलेलं दप्तर आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास यावरुन दरवर्षी शाळा सुरू झाल्यावर चर्चा होते. पण आता विद्यार्थ्यांच्या दप्तरात किती ओझं आहे, हे तपासण्यासाठी शिक्षण विभागानं दोन पथकांची नियुक्ती केलीय. ही पथकं शाळांना अचानक भेट देऊन दप्तरांची तपासणी करतायत. या तपासणीमध्ये शालेय शिक्षण विभागानं ठरवून दिलेल्या पुस्तकांशिवाय अनेक वेगळी पुस्तकं आढळलीयत.
आता यासंदर्भात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मराठी माध्यमांच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांची दप्तरं जास्त जड असल्याचं समोर आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखी, खांदेदुखी अशा आजारांचा सामना करावा लागतोय. विद्यार्थ्यांना मोजकीच वह्यापुस्तकं आणण्याबरोबर शाळेतच लॉकर उपलब्ध करुन देण्याची मागणी होतेय.