दिवाळीत भेसळ: कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप!

दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2012, 07:59 PM IST

प्रताप नाईक, www.24taas.com, कोल्हापूर
दिवाळीसाठी फराळ करण्यासाठी खरेदी करताना राहा सावधान. दिवाळीच्या फराळात भेसळयुक्त पदार्थांची गर्दी आहे. कोंबडीच्या स्कीनचं साजूक तूप, गुलकंदात टीश्यू पेपरचे तुकडे अशा प्रकारची भेसळ होत आहे.
दिवाळीच्या तोंडावर अशा पद्धतीनं तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे खरेदी करताना सावधान. साजूक तुप आणि गुलकंदात अशी भेसळ होत असल्याचं सत्य कोल्हापुरातले जागरुक नागरीक अशोक देसाईंनी उघड केलंय.
दहा रुपये खर्चून आणलेल्या चिकनच्या स्कीनपासून वाटीभर तूप तयार केलं जातं. सुरुवातीला चिकनची स्कीन एका भांड्यात घेऊन ती गरम करण्यात येते. जवळपास दहा मिनिटं ही स्कीन आचेवर ठेवल्यानंतर त्यातनं अडीचशे ग्रॅमहून अधिक तेलकट पदार्थ निघतो. मात्र या तेलाला चामड्याचा वास येतो. हा वास निघून जाण्यासाठी त्यात कढिपत्ता आणि लसणाचे दोन तुकडे घातले जातात. कडिपत्ता आणि लसणामुळे चामड्याचा वास नाहिसा झाला की हे तेल भांड्यात काढून फ्रिजमध्ये ठेवलं जातं.. आणि काही वेळाने हे भांडं बाहेर काढलं की भांड्यात असतं साजूक तूप.. अर्थात बनावट...
गुलकंदाच्या विक्रीतही अशीच फसवणूक होतेय. बाजारात दहा रुपयाला मिळणाऱ्या टिश्यू पेपरचे बारीक तुकडे करुन त्यात खाण्याचा रंग, पाणी, गुलकंदाचा इसेन्स आणि साखर टाकून बनावट गुलकंद तयार केला जातो.
त्यामुळे असे बनावट पदार्थ आढळल्यास नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी... किंवा ही बाब ग्राहक पंचायतीच्या निदर्शनास आणावी.ग्राहकांनी जागरुकता दाखवल्यास आणि अन्न आणि औषध प्रशासनानंही दोषींवर कडक कारवाई केली तरच भेसळखोरांवर आळा बसेल.