www.24taas.com, मुंबई
अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदाची दिवाळी मोठी असणार आहे. यासाठी बच्चन यांनी ठाण्यातल्या कैलास देसले यांच्याकडं २०० आकाश कंदीलांची ऑर्डर नोंदवलीय. इको फ्रेंडली कंदील बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
रंगेबेरंगी,वेगवेगळ्या आकारांचे,रेखीव असे इको फ्रेंडली कंदील सध्या बाजारात ग्राहकांना आकर्षित करतायेत. पर्यावरणाच्या बचावासाठी गेली १५ वर्ष कैलास देसले इको-फ्रेंडली कंदील बनवित आहेत. त्यांनी अगदी १० रूपयांपासून ते साडेपाचशे रूपयांपर्यंत पारंपरिक पद्धतीचे कंदील बनविले आहेत. या कंदीलांना मोठी मागणी असते.
बांबू,चटई,कापड,कागद,कार्डबोर्ड यांचा वापर करून हे कंदील तयार केले आहेत. यंदा तर, चक्क अमिताभ बच्चन यांनी कैलास देसलेंना २०० कंदीलांची ऑर्डर दिली आहे. कैलास यांच्या या अभिनव उपक्रमाला ग्राहकही मोलाचा हातभार लावतायेत. चायनिज कंदीलांना या इको फ्रेंडली कंदीलांमुळे आळा बसेल असं ग्राहकांना वाटतयं.
आकाश कंदीलांमुळे दिवाळीत प्रसन्न वातावरण निर्माण होतं. पर्यावरणापूरक अशा या कंदीलांचा पर्यावरणप्रेमी ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे. त्यात देसलेंना बच्चन कुटुंबियांनी दिलेल्या इको फ्रेंडली कंदीलाच्या ऑर्डरमुळे ग्राहकही या कंदीलांना पसंती देतायत.