www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने २०१४ निवडणुकांकरता टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला कोलकात्यातून खासदारकीचं तिकिट देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र गांगुलीनं भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावत मी क्रिकेटर आहे राजकारणापेक्षा मैदानात चांगली कामगिरी करेन, असं सांगत निवडणूक लढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनूसार भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांगुलीसमोर हा प्रस्ताव मांडला होता. तसंच त्यांनी या बंगाली क्रिकेटरला कॅबिनेट क्रीडा मंत्री बनवण्याचं वचन दिल्याची माहिती या वृत्तपत्रांनी दिली होती.
ही माहिती पुढं येताच तर्कवितर्क सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर गांगुलीनं राजकारणात पडण्याची अद्याप तयारी केली नसल्याचं सांगितलंय. भाजपनं राज्यसभेवर पाठवल्यास जाणार का?, असा प्रश्न विचारला असताना, गांगुलीनं स्पष्ट उत्तर देण्याऐवजी नकारार्थी डोकं हलवून आणखी बोलणंच टाळलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.