www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जखमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही सिनिअर खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे.
उद्या होणाऱ्या बैठकीत सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यावर मुख्यत्वे चर्चा होणार आहे. निवड समितीने वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या त्रिकोणीय मालिकेसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीची टीम कायम ठेवली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय खेळाडू सलग क्रिकेट खेळत आहेत. तसेच यावर उद्या निवड समितीच्या बैठकीत चर्चा होईल आणि कोणाला विश्रांती द्यायची यावर निर्णय घेण्यात येईल.
स्नायूंना दुखापत झाल्याने कर्णधार धोनी त्रिकोणीय मालिकेतील इतर सामने खेळणार नाही. मात्र, आगामी २४ जुलैपासून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी तो उपलब्ध राहणार की नाही याबद्दल माहिती मिळू शकली नाही. धोनीला आराम देण्यात आला तर विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात येऊ शकते. तसेच अनुभवी फलंदाज म्हणून गौतम गंभीरलाही पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
डावखुरा फलंदाज गंभीरच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला संघातील आपले स्थान गमावावे लागले होते. परंतु, त्याला मुरली विजयच्या जागेवर संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. विजयला दिल्लीचा शिखर धवनसह इनिंगची सुरूवात करण्यासाठी निवडण्यात आले होते. परंतु आता ती जबाबदारी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.