www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पावसात वाहून गेलेल्या रांची वन-डेमुळे टीम इंडियाचं नंबर वन स्थान अबाधित राहिलं असलं. तरी टीम इंडियासाठी रांची वन-डेत आणखी एक चांगली बातमी मिळाली ती मोहम्मद शमीच्या रूपात... ईशांत शर्माला विश्रांती देऊन टीममध्ये आलेल्या मोहम्मद शमीने संधीचं सोनं करताना मॅचमध्ये तीन विकेट्स घेत धोनी ब्रिगेडसमोरील बॉलिंगची समस्या थोड्या फार प्रमाणात नक्की सोडवली आहे.
रांची वन-डेत ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सनी पुन्हा एकदा भारतीय बॉलिंगची पिसं काढत धावांची लयलूट केली. मात्र, मोहम्मद शमीचा स्पेल हा टीम इंडियाकरता सुटकेचा निश्वास सोडण्यास पुरेसा होता. आधीच्या तीन वन-डेत सपशेल अपयशी ठरलेल्या ईशांत शर्माची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्मद शमीची टीम इंडियात रांची वन-डेकरता निवड करण्यात आली होती. आत्तापर्यंत सातपेक्षा अधिकच्या सरासरीने रन्स देत प्रतिस्पर्ध्यांच्या अवघ्या २ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरलेल्या ईशांतपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी करण्याचा दबाव निश्चित शमीवर होता आणि शमीनेही दबावाखाली दमदार कामगिरी करत आपलं नाणं खणखणीत वाजवलं.
मोहम्मद शमीने आपल्या ८ ओव्हर्समध्ये एक मेडन ओव्हर्ससह ५.२५ च्या सरासरीने ४२ रन्स देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. प्रथम बॅटिंगकरता मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन बॅट्समन्सचं आव्हान मोडित काढण्याची जबाबदारी नवख्या उनाडकत आणि शमी या फास्ट बॉलर्सवर होती. ती त्यांनी इमानेइतबारे पार पाडली. आत्तापर्यंत कांगारूंना विस्फोटक ओपनिंग करून देण्यात यशस्वी ठरलेल्या ऍरॉन फिंचची अवघ्या ५ रन्सवर दांडी गुल करत शमीने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये फिलिप ह्युजेसचा धोनीकरवी कॅच आऊट करत शमीने २४ रन्सवर कांगारूंना दुसरा धक्का दिला आणि भारतीय गोटात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. लगेचच त्याच ओव्हरमध्ये शमीने फॉर्मात असलेला ऑसी कॅप्टन जॉर्ज बेलीला चकवत त्याची विकेट काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
मात्र, सेकंड स्लीपमध्ये असलेला विराट कोहली बेलीचा कॅच घेण्यात अपयशी ठरला आणि शमीची संधी हुकली. त्यानंतर लगेचच शमीने ऑसीजचा वन मॅन आर्मी असणाऱ्या शेन वॉटसनचाही अडथळा दूर करत कांगारूंना सुरूवातीलाच थोपवण्यात मिळवलं. त्याने वॉटसनला बोल्ड करत वैयक्तिक तिसऱ्या विकेटची नोंद केली. त्याच्या या कामगिरीवर स्वत: कॅप्टन धोनी बेहद खुष असून सीरिजमधील उर्वरित मॅचेसमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा सर्वांना असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.