सराव सामन्यात भारताकडून लंका’दहन’

विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने काल सराव सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी आणि ६ चेंडू राखून पराभव केला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 2, 2013, 09:23 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम
विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने काल सराव सामन्यात श्रीलंकेचा ५ गडी आणि ६ चेंडू राखून पराभव केला. विराट कोहलीने शानदार १४४ धावा केल्या. १२० चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले तर दिनेश कार्तिकने आपला आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवत नाबाद १०६ धावा केल्या आपल्या ८१ चेंडूंच्या खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकार लगावले.
भारताच्या विजयात कोहली व कार्तिकसह सुरेश रैना (३४) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद १८) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. आक्रमक फलंदाजी करणारा कोहली माघारी परतल्यानंतर दिनेश कार्तिकने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
फलंदाजीला अनुकुल खेळपट्टीवर कुशल परेरा व तिलकरत्ने दिलशान यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ३ बाद ३३३ धावांची दमदार मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने विजयासाठी आवश्यक धावा ४९ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.
त्याआधी, दिलशान (८४ धावा, ७८ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) आणि कुशल परेरा (८२ धावा, ९४ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर श्रीलंकेने ३ बाद ३३३ धावा फटकावल्या. परेरा व दिलशान यांनी २६ षटकांमध्ये १६० धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांविरुद्ध भारतीय गोलंदाज संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. वेगवान गोलंदाज इरफान पठाणने ४३ धावा बहाल केल्या, पण बळीचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. भुवनेश्वोर कुमार व ईशांत शर्मा यांनी अनुक्रमे ५८ व ४१ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला. फिरकीपटू आर. अश्वि न व रवींद्र जडेजा यांना मात्र बळी घेता आला नाही तर, अमित मिश्राने ५३ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. श्रीलंकेच्या डावात दिनेश चंदीमल (४६), तिसारा परेरा
(नाबाद २६) आणि माहेला जयवर्धने (३०) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. (वृत्तसंस्था)
धावफलक
श्रीलंका :
कुशल परेरा ८२ (निवृत्त), तिलकरत्ने दिलशान ८४ (निवृत्त), महेला जयवर्धने झे. पठाण गो. शर्मा ३०, कुमार संगकारा झे. अश्वििन गो. मिश्रा ४५, दिनेश चंदीमल झे. धोनी गो. कुमार ४६, तिसारा परेरा नाबाद २६, दिलहारा लोकुहेट्टिगे नाबाद ०६. अवांतर (१४). एकूण ५० षटकांत ३ बाद ३३३. गोलंदाजी : पठाण ५-०-४५-०, कुमार ८-०-५८-१, शर्मा ६-०-४१-१, विनय ७-०-४२-०, अश्विन ८-०-४५-०, जडेजा ८-०-४१-०, मिश्रा ८-०-५३-१.
भारत :
शिखर धवन धावबाद ०१, मुरली विजय झे. थिरिमाने गो. इरंगा १८, विराट कोहली झे. चंदीमल गो. इरंगा १४४, रोहित शर्मा झे. कुलसेकरा गो. परेरा ०५, सुरेश रैना त्रि. गो. सेनानायके ३४, दिनेश कार्तिक नाबाद १०६, महेंद्रसिंग धोनी नाबाद १८. अवांतर (११). एकूण ४९ षटकांत ५ बाद ३३७. गोलंदाजी : कुलसेकरा ९-०-५६-०, मॅथ्यूज ५-०-२६-०, इरंगा ९-०-६०-२, परेरा ६-०-३४-१, सेनानायके ६-०-४२-१, हेराथ ७-०-४४-०, मेंडिस ३-०-३१-०, दिलशान ३-०-२०-०, लोकुहेट्टिगे १-०-१८-०.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.