www.24taas.com, हैद्राबाद
भारतीय क्रिकेटसाठी आज दुहेरी आनंद देणारा दिवस ठरला आहे. अंडर-१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. तर दुसरीकडे भारतीय टीमने किवींना गुडांळून पहिली कसोटी आपल्या खिशात टाकली आहे.
आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा या जोडीने किविजची मधली फळी उद्ध्वस्त केली. चहापानानंतर अर्धा तासातच उर्वरित 4 फलंदाजांना बाद करुन भारताने न्यूझीलंडवर एक डाव आणि 115 धावांनी विजय मिळविला.
ब्रँडन मॅक्कुलम आणि केन विलियम्सन यांनी कडवा प्रतिकार केला. अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर उमेश यादवने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मॅक्कुलमला त्याने 42 धावांवर पायचित केले. हा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेला कर्णधार रॉस टेलर अश्विनच्या गोलंदाजीवर फसला.
बाहेरचा चेंडू त्याने सोडला. परंतु, टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आत वळला आणि टेलरचा त्रिफळा उडवून गेला. विलियम्सनने एका बाजुने खिंड लढविली. परंतु, तोदेखील 52 धावा काढून बाद झाला. अश्विनने दुसऱ्या डावातही 6 बळी घेतले. तर ओझाने 3 फलंदाज बाद केले.