www.24taas.com , झी मीडिया, सिंगापूर
सिंगापूर इथं झालेल्या २३ वर्षांखालील एसीसी इमिर्जिंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात ९ गडी राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविलाय. या मॅचमध्ये भारतानं आपल्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करत पाकिस्तानला अक्षरश: धूळ चारलीय.
पाकिस्ताननं भारतासमोर ठेवलेलं १६० रन्सचं आव्हान भारतीय टीमनं केवळ एका गड्याच्या मोबदल्यात अवघ्या ३३ ओव्हरमध्ये पार केलं. या संपूर्ण सीरिजमध्ये भारतीय संघ भलताचा फॉर्मात होता. लोकेश राहुल आणि मनप्रित जुनेजा यांच्या हाफ-सेंच्युरीच्या जोरावर भारतानं ही मॅच जिंकली.
सिंगापूरमधील कलांग स्टेडियमवर झालेल्या या फायनल मॅचमध्ये सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना चमक दाखविता आली नाही. पाककडून सर्वाधिक रन्स उमर वाहिद (41 धावा) यानं केलं. सूर्यकुमार यादव कर्णधार असलेल्या भारतीय टीममध्ये 19 वर्षांखालील वर्ल्डकप विजेत्या टीमचा कप्तान उन्मुक्त चांदसह समीत पटेल, बाबा अपराजित, संदीप शर्मा यांचा समावेश होता.
२३ वर्षाखालील भारतीय टीमनं पाकिस्तानाचा डाव ४७ ओव्हरमध्येच गुंडाळला. भारतीय बॉलर्सनी आपली कामगिरी पार पाडल्यानंतर बॅट्समननीही आपली भूमिका चोख निभावली. लोकेश राहुल नाबाद ९८ रन्स आणि मनप्रित जुनेजा नाबाद ५१ रन्सच्या जोरावर भारतानं पाकवर सहज मात केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.