`भारतरत्ना`ची मॅच आधीच फिक्स झाली होती!

देशातला सगळ्यात मोठा सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कारावरून आता एक नवीन वाद उभा राहिलाय. ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानंचंद यांची फाईल सरकारी मंत्रालयांमध्ये अनेक महिने फक्त फिरत राहिली..

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 21, 2014, 10:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशातला सगळ्यात मोठा सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कारावरून आता एक नवीन वाद उभा राहिलाय. ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानंचंद यांची फाईल सरकारी मंत्रालयांमध्ये अनेक महिने फक्त फिरत राहिली... आणि याच वेळी माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करणाऱ्या फाईलची एन्ट्री झाली आणि केंद्र सरकारनं ताबडतोब सचिनला भारतरत्न सन्मान दिला जावा, यावर शिक्कामोर्तब केलं. ‘आरटीआय’मार्फत मागितल्या गेलेल्या माहितीवरून हा खुलासा झालाय.
सचिन तेंडुलकर याला भारत रत्न देण्यासाठी सगळ्यांच नियमांना तिलांजली दिली गेली, हे या आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनंतर स्पष्ट झालंय. ध्यानचंद यांना भारत रत्न दिलं जावं, अशी शिफारस करणारी फाईल कित्येक महिने धूळ खात इकडच्या टेबलावरू तिकडच्या टेबलावर टोलावली गेली... परंतु, सचिननं आपली निवृत्तीच्या बातम्या येताच त्याला भारत रत्न दिला जावा यासाठी सगळ्याच नियमांना बाजुला सारलं गेलं... आणि त्यामुळेच सचिनला हा भारतरत्न मिळाला.
2014 मध्ये 4 जानेवारी रोजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर याला ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मानानं गौरविलं गेलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सचिन तेंडुलकर याला हा सन्मान प्रदान केला होता.
या माध्यमातून समोर आलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे, भारत सरकारनं 2013 मध्ये ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची तयारी पूर्ण केली होती तर या निर्णयाला अचानक का बदलण्यात आलं? क्रीडा मंत्रालयानं ध्यान चंद यांना भारतरत्न देण्याची शिफारस केली होती. परंतु, क्रीडा मंत्रालयाची शिफारस का नामंजूर करण्यात आली, याचं स्पष्टीकरण भारत सरकारनं क्रीडा मंत्रालयाला का दिलं नाही? प्रश्न हादेखील आहे की, देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस करणारी फाईल इकडून तिकडे का टोलावली गेली?

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरनं नोव्हेंबर 2013 मध्ये मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध आपला अंतिम 200 वा टेस्ट सामना खेळून निवृत्ती स्वीकारली होती. सचिन क्रिकेटच्या जगतातील रेकॉर्डच्या जगताचा बादशाह म्हणून ओळखला जातो. सचिननं आपल्या करिअरमध्ये एकूण 200 टेस्ट मॅच खेळल्यात. त्यानं टेस्ट मॅचमध्ये 53.78 अॅव्हरेजनं 15,921 रन बनवलेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे 248, जो त्यानं बांग्लादेशविरुद्ध मॅचमध्ये ढाकामध्ये उभा केला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं 51 शतक आणि 68 अर्धशतक ठोकलेत. तर वन डे क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 463 मॅच खेळल्यात. वन डेमध्ये 452 मॅचमध्ये त्यानं 44.83 अॅव्हरेजनं 18,426 रन्स आपल्या खात्यात जमा केले. यामध्ये 49 शतक आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे.
ध्यानचंद
दुसरीकडे, हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांना भारतासाटी 1928 (अॅमस्टरडॅम), 1932 (लॉस एन्जेलिस) आणि 1936 (बर्लिन) या तीन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल हस्तगत केले होते. हॉकीच्या या महान खेळाडूनं 1979 मध्ये जगाचा निरोप घेतला. ध्यानचंद यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात हॉकीसाठी भारतीयांना प्रोत्साहीत करण्याची किमया केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.