www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांना आज सकाळी राजस्थान क्रिकेट संघाचा (आरसीए) नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे धाबे दणाणलेत. ताबडतोब कारवाई करत बीसीसीआयनं आता ‘आरसीए’लाच निलंबित केलंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयनं क्लॉज 32 नुसार आरसीएला निलंबित केलंय. सोबतच, बीसीसीआयनं आरसीएला कारणे दाखवा नोटीसही बजावलीय. ललित मोदींनी लंडनमध्ये राहून आरसीएची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना विजय प्राप्त झालाय. या विजयामुळे ललित मोदी पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये एन्ट्री मिळाल्याचं मानलं जात होतं.
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर आज आरसीएच्या निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये ललित मोदींची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. आरसीएची निवडणूक 19 डिसेंबर 2013 रोजी पार पडली होती. या निवडणुकीत ललित मोदी यांना 24 मतं मिळाली तर त्यांचे विरोधक रामपाल शर्मा यांना केवळ पाच मतं मिळू शकली.
ललित मोदींवर बीसीसीआयनं बंदी आणली होती. आरसीएच्या निवडणुकतीत हा निकाल ललित मोदींच्या बाजुनं लागण्याची दाट शक्यता बीसीसीआयला होतीच. त्यामुळे त्यांनी हे निकाल जाहीर करण्याला हरकत घेतली होती. पण, सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी राजस्थान क्रिकेट संघाच्या निवडणूक निकाल 6 मे रोजी घोषित करण्याचे निर्देश दिले होते. या निवडणूक निकालांबद्दल कुणाला तक्रार असेल तर त्यानं योग्य ठिकाणी या निवडणुकीला आव्हानं द्यावं, असा निकाल यावर सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.