तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही!

आयसीसीच्या गर्व्हनिंग बॉडीमध्ये माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना खेळाडूंचा प्रतिनिधी नियुक्त करण्यावरून सुरू झालेला वाद आता विकोपाला पोहचत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 13, 2013, 04:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयसीसीच्या गर्व्हनिंग बॉडीमध्ये माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना खेळाडूंचा प्रतिनिधी नियुक्त करण्यावरून सुरू झालेला वाद आता विकोपाला पोहचत आहे. हा वाद लवकरच सोडविला गेला नाही तर भारतीय क्रिकेट टीम चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही. या बाबत बीसीसीआयने आयसीसीला धमकी दिली आहे.
शिवरामकृष्णन यांच्या निवडीवर फिकाचे सीईओ टीम मे यांनी ज्या प्रकारे विरोध केला आहे. त्यामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली.
या संदर्भातील बातम्यांनुसार बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नाही खेळण्याची धमकी दिली आहे. टीम मे यांनी या संदर्भात म्हटले की, कर्णधारांना प्रभावित करून शिवरामकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली. याचे ठोस पुरावे आहेत. कर्णधारांना त्यांच्या पसंतीने मत टाकू दिले नाही. तसेच टेस्ट खेळणाऱ्या संघांच्या कर्णधारांना क्रिकेट बोर्डांनी आणि बीसीसीआयने प्रभावित केले, असल्याचे फिकाने सांगितले.
पहिल्यांदा झालेल्या मतदानात टीम यांना ९ आणि शिवरामकृष्णन यांना एक मत मिळाले होते. पण बीसीसीआयने पैशाच्या जोरावर पाक, बांग्लादेश, श्रीलंका आणि झिम्बाव्बे क्रिकेट बोर्डांना प्रभावित केले. बोर्डांना शिवरामकृष्णन यांना मतदान करण्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे बोर्डाने आपल्या कर्णधारांना मतदान करण्यास सांगितले, आणि दुसऱ्यांदा झालेल्या मतदानात शिवरामकृष्णन हे जिंकले.
विशेष म्हणजे चॅम्पियन्स टॉफीचा पहिला सामना सहा जून रोजी कार्डिफमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर भारत ग्रुप बीमध्ये ११ जूनला ओव्हलमध्ये वेस्ट इंडिज आणि १५ जूनला बर्मिंगघम मध्ये आपला शेवटचा साखळी सामना पाकिस्तानशी खेळणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.