ऊर्मिला मातोंडकरचा मराठीत जलवा

‘रंगिला’ या हिंदी या चित्रपटाची मुख्य नायिका अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आता मराठीच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. राज्यात बिबट्याचे जीवघेणे हल्ले होत आहे. यावर सुजय सुनील डहाके चित्रपट निर्मिती करीत आहे. त्यांच्या `आजोबा` या चित्रपटात ऊर्मिला काम करणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2013, 03:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘रंगिला’ या हिंदी या चित्रपटाची मुख्य नायिका अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आता मराठीच्या पडद्यावर झळकणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. राज्यात बिबट्याचे जीवघेणे हल्ले होत आहे. यावर सुजय सुनील डहाके चित्रपट निर्मिती करीत आहे. त्यांच्या `आजोबा` या चित्रपटात ऊर्मिला काम करणार आहे.
बिबट्याचा थरारक प्रवास `आजोबा` या चित्रपटाच्या माध्यमातून थेट रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. `शाळा` या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचा तरुण आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सुजय सुनील डहाके याचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. मराठीत प्रथमच या चित्रपटातून ग्राफिक्सची कमाल दिसणार आहे. बिबट्या केंद्रबिंदू असलेल्या या चित्रपटासाठी सुजयने पुन्हा एकदा हॉलिवूडच्या तंत्रज्ञांना पाचारण केले आहे.
`गँग्ज ऑफ वासेपूर` या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेल्या फैजल ऊर्फ नवाजुद्दीन सिद्दिकी यापूर्वी या चित्रपटात भूमिका करणार होता; पण त्याऐवजी यशपाल शर्माला संधी देण्यात आलेय. `हृदयनाथ` या जुलै २०१२ मध्ये आलेल्या अमर गुप्ते यांच्या मराठी चित्रपटात ऊर्मिला मातोंडकरने आयटम साँग केले होते. त्यानंतर, ती रुपेरी पडद्यावरून गायब झाली होती; पण पुनरागमनासाठी तिने मायबोलीचा आधार घेतला आहे. यशाच्या शिखरावर असताना मराठीत भूमिका करण्याचा विचारही न करणाऱ्या ऊर्मिलाने पुनरागमनासाठी मात्र सुजयसारख्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शकाचा चित्रपट स्वीकारला आहे.
या चित्रपटात विद्या अत्रेय या वन्य जीवसंशोधकावर आधारित पूर्वा राव ही भूमिका ऊर्मिला साकारते आहे. बिबट्या आणि कुत्रा एका विहिरीत पडतात. तेव्हा त्या कुत्र्याला न खाता हा बिबट्या शांत आजोबाची भूमिका बजावतो. त्यानंतर सुरू होतो त्याचा मंचर ते मुंबई असा १२० किलोमीटरचा थरारक प्रवास. `आजोबा` हा एका बिबट्याच्या आयुष्यावर सत्यघटनेवर आधारित चित्रपट आहे.

जुन्नर, नाशिक आणि माळशेज घाट या परिसरात केवळ २८ दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ग्राफिक्सचा भरपूर वापर असलेला हा मराठीतील पहिलाच चित्रपट आहे. ऊर्मिलासोबत यशपाल शर्मा मराठीत प्रथमच येतोय. सुहास शिरसाट, शशांक शेंडे, श्रीकांत यादव, ओम भूतकर, अनिता दाते, चिन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

`शाळा`प्रमाणेच या चित्रपटासाठीही ईयो रोमेरो सुरेझ लेनोज दिएगो हा स्पेनचा तंत्रज्ञ चित्रपटाचा फोटोग्राफी डायरेक्टर तसेच लेखक आहे, तर अमेरिकेच्या बेन पॅटन यांनी ओरिजनल साउंड ट्रॅकची तसेच हॉलिवूडच्या ग्रेग कुर्डा आणि ख्रिस्तोफर रॉबलेटो हार्वे यांनी साउंड डिझायनरची बाजू सांभाळली आहे. २६ फेब्रुवारीपासून फेसबुकवरील `आजोबा` पेजला `लाइक` करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.