www.24taas.com, मुंबई
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अवैधपणे हत्यारं बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. संजयची शिक्षा माफ केली जावी, अशी मागणी जोरावर असली तरी संजयनं आपण माफीसाठी अर्ज करणार नसल्याचं म्हटलंय. हे सगळं लक्षात घेतलं तर, संजय जेलमध्ये गेला किंवा त्याला माफी मिळाली... तरी त्याला आपल्या मुलीला - त्रिशलाला भेटणं थोडं कठिणचं दिसतंय.
त्रिशला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी... ऋचाच्या मृत्यूनंतर त्रिशाला आपल्या आजी-आजोबांसमवेत अमेरीकेत वास्तव्यास आहे. माफीच्या अर्जानंतरही संजय दत्तला अमेरिकासहित अनेक देशांमध्ये जाण्यास परवाना नाकारला जाऊ शकतो. तसंच अमेरिकेच्या कायद्यानुसार कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याला देशात प्रवेश करण्यास बंदी आहे. त्यामुळे संजय दत्तला अमेरिकेत जाण्यासाठी परवाना मिळणंदेखील कठिण आहे.
संजय दत्तच्या जवळच्या मित्रांच्या म्हण्यानुसार, मागच्या पाच वर्षापासून संजयच्या पासपोर्टवर बंदी घालण्यात अनेक निर्बंध घालण्यात आलेत. प्रत्येक परदेशी शूटींगसाठी संजयला कोर्टातून परवागी घ्यावी लागत होती.
संजयनं याआधी शिक्षेनुसार दीड वर्ष तुरुंगात काढली असली तरी त्याला उर्वरीत शिक्षा पूर्ण करण्यासाठी लवकरचं पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे. दरम्यान, त्याने पत्रकार परिषदेत कोर्टासमोर शरणागतीही पत्करणार असल्याचं म्हटलं होतं. पण, तुरुंगात जाण्याअगोदर त्रिशलला भेटता येणार नाही, याची खंत संजयला सतावतेय.