www.24taas.com, मुंबई
खरंतर बॉलिवूडचे स्टार्स कुठल्याही राजकीय वादात पडू इच्छित नसतात. राजकारण्यांपासून तर ते चार हात लांबच राहाणं पसंत करतात. त्यातूनही जर राज ठाकरेसारखे वादग्रस्त राजकारणी असतील, तर कुणीही त्यावर मत प्रदर्शित करण्याची हिंमत करायला जात नाही. मात्र रविना टंडन याला अपवाद ठरली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध मस्त मस्त गर्ल रविना टंडन हिने राज ठाकरेंच्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल मत वचारलं असता रविना म्हणाली, “खरं सांगायचं तर राज ठाकरे काही चुकीच बोलत नाहीयेत. भारतात यापूर्वी पाकिस्तानातून अनेक ‘विनोदी’ कलाकार भारतात येतात आणि परत गेल्यावर आपलीच वाट लावतात. कसाबसारखे दहशतवादी पाठवणं असो वा द्वेषमूलक एसएमएस पाठवणं असो. पाकिस्तानी नेहमीच घाणेरडा खेळ खेळतात. मग आपण कुठल्या मैत्री आणि सांस्कृतिक देवाणी घेवाणीबद्दल त्यांच्याशी बोलतोय.”
7 सप्टेंबरपासून कलर्स चॅनलवर सुरू होत असलेल्या सुरक्षेत्र या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही कार्यक्रमाच्या परीक्षिका होऊ नयेत, अशी गळ घातली होती. मात्र, आशा भोसले यांनी राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, रविना टंडनने राज ठाकरेंची बाजू घेतली आहे.