www.24taas.com, मुंबई
अभिनेत्री आएशा टाकियानं स्वत:च्या बॉलिवूडमधील करियरला टाटा-बाय-बाय केलंय असंच म्हणावं लागणार आहे. ती आता छोट्या पडद्यावर प्रवेश करतेय...
आएशा आता लवकरच, भारतीय – पाकिस्तानी गायकांच्यासोबत ‘सूरक्षेत्र’ या कार्यक्रमात छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या कार्यक्रमाचं प्रस्तुतीकरण म्हणजेच ‘होस्टींग’ आएशा करणार आहे. आणि याबद्दल आएशा बरीच समाधानीही आहे. तिनं ट्विटरवर यासंबंधी लिहलंय की, ‘माझ्या डोक्यात सध्या चित्रपटांविषयी काहीच जागा नाही, याच्यावर जेव्हा लोक विश्वास ठेवत नाहीत तेव्हा मला विचित्रच वाटतं. आतासुद्धा वर्तमानपत्रांत माझ्याबद्दल काही ना काही छापून येत असतं.’
तर अशा सगळ्या लोकांच्या प्रश्नांना आणि तर्क-वितर्कांना उत्तर देताना आएशा म्हणते, ‘स्पष्टच सांगायचं झालं तर माझ्या डोक्यात चित्रपटांसंदर्भात काहीच जागा नाहीए. ना मला चित्रपटांबद्दल काही आकर्षण वाटतंय. सध्या मी व्यवसाय, भ्रमंती, परिवार आणि घरात खूप व्यस्त आहे.’
या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आएशा सूरक्षेत्राचं सूत्रसंचालन करतेय. येत्या शनिवारपासून या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू होईल. ‘मोड’ या चित्रपटात आएशा शेवटचं दिसली होती. यानंतर ती एक रेस्टॉरंट मालक आणि राजकीय नेते अबू असिम आजमी यांचा मुलगा फरहान आजमी याच्याबरोबर विवाहबद्ध झालीय. त्यामुळे आता आएशा पुन्हा चित्रपटांत कधीच दिसणार नाही का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतावतोय.