www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता अनिल कपूरचा ‘नायक’ सिनेमा तुम्हाला आठवतंच असेल. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं तरुणांच्या मनात एक वेगळंच घर केलं होतं. अतिशयोक्ती वाटावी असा हा सिनेमाही लोकांना चांगलाच भावला होता. असाच खराखुरा कारनामा अल्पावधीतच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊन ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी करून दाखवलाय. याच अरविंद केजरीवाल यांच्या खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारीत असा एक सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्याची चिन्हं आहेत.
एक ‘आयआयटी’मध्ये शिकलेला हुशार विद्यार्थी... इन्कम टॅक्स अधिकारी आणि त्यानंतर हातात झेंडा घेऊन सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झालेला एक युवक... आणि त्याच हातात झाडू घेऊन दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसणारा एक संशयमशील नेता... असा थक्क करणारा अरविंद केजरीवाल यांचा प्रवास तरुणांपुढे एक खराखुरा आदर्श उभा करणारा ठरलाय.
अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळी रामलीला मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी अनेक उपस्थितांच्या हातात ‘नायक’ सिनेमाचे पोस्टर्स होते. या पोस्टर्सवर अनिल कपूरच्या ऐवजी अरविंद केजरीवाल यांचा फोटो लावण्यात आला होता.
एखाद्या सिनेमापेक्षाही रोमांचकारी ठरणारा असा अरविंद केजरीवाल यांचा हा प्रवास खऱ्याखुऱ्या जीवनाचा एक भाग आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची हा यशस्वी प्रवास मोठ्या पडद्यावरही लवकरच दिसू शकतो. अभिनेता अनिल कपूर ‘नायक’चा सिक्वल ‘नायक-२’ बनविण्याच्या तयारीत आहे. अनिल कपूर यांच्या मते, ‘नायक-२’ २०१५ पर्यंत पूर्ण होईल. हा सिनेमा पहिल्या सिनेमापेक्षा अगदी वेगळा आणि खऱ्याखुऱ्या घटनांवर आधारीत असेल. गेल्या वर्षभरापासून या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.