अंतरा माळीचा पिता भिकाऱ्यांच्या रांगेत; सल्लूचा मदतीचा हात!

रेखाची सुंदरता आपल्या कॅमेऱ्यातून अधिक खुबीनं खुलवणारे एकेकाळचे प्रसिद्ध फोटोग्राफ जगदीश माळी आज रस्त्यावर भीक मागताना आढळलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 17, 2013, 11:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
रेखाची सुंदरता आपल्या कॅमेऱ्यातून अधिक खुबीनं खुलवणारे एकेकाळचे प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी आज रस्त्यावर भीक मागताना आढळलेत. अभिनेत्री अंतरा माळी हिचा बाप असलेला हा कलाकार फाटक्या-मळलेल्या कपड्यांत वर्सोवाच्या रोडवर दिसला.
‘बीग बॉस सीझन ६’ या कार्यक्रमात दिसलेली मिंक बरार ही आपल्या भावासोबत वर्सोवाच्या रोडवर बसलेल्या भिकाऱ्यांना घोंगड्या दान करत होती. त्यावेळी तिची नजर जगदीश माळी यांच्यावर गेली. जगदीश यांना ओळखण्यासाठी तिला आपल्या डोक्याला फार ताण द्यावा लागला नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून जगदीश यांना काही खायला-प्यायला मिळालेलं नाही, हे त्यांच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होतं... त्यांना काही कळत नव्हतं... ना कसली आठवत होती...
मिंक आणि तिच्या भावानं माळी यांना ‘तुम्हाला कुठं जायचंय?’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं ‘माझ्या स्टुडिओत’… अशी मिंक हिनं माहिती दिलीय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगदीश यांनी काही वर्षापूर्वीच आपला स्टुडिओ विकून टाकलाय पण आता मात्र त्यांच्या हे विस्मृतीत गेलंय. पण त्यांना अजूनही स्टुडिओ मात्र आठवतोय.
मिंक हिनं जगदीश माळी यांच्याबद्दल कळवण्यासाठी सलमानला फोन केला तेव्हा त्यानं `बिईंग ह्युमन` या समाजसेवी संस्थेच्या मदतनीसांनी तातडीने तेथे येत , माळी यांना त्यांच्या घरी नेले. तिथे एकटेच रहात असल्याचे आढळल्यावर त्यांना वैद्यकीय मदतीसाठी लोणावळ्याला हलवण्यात आले.
जगदीश माळी हे ८० आणि ९० च्या दशकांतले प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. त्यांनी अनेक न्यू कमर्स आणि फेमस फिल्मी तारे-तारकांच्या अनेक सुंदर छबी कॅमेऱ्यात कैद केल्यात. ‘फिल्मी दुनियेत त्यांच्या नावाला वेगळीच ओळख होती. पण, सगळं काही असूनदेखील ते एकटे होते’, असं सिनेमा निर्माता पहलाज निहलानी यांनी म्हटलंय. ‘शोला और शबनम’ या चित्रपटात निहलानी आणि माळी यांनी एकत्र काम केलं होतं.

जगदीश माळ यांची मुलगी अंतरा माळी हीदेखील हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तेव्हा अंतरा सध्या आपल्या आईसोबत माहीममध्ये राहत होती. सध्या, अंतरानं एका पत्रकारासोबत लग्न केलंय आणि ती दक्षिण मुंबईमध्ये राहतेय. जगदीश माळी यांच्याबद्दल जेव्हा अंतराला कळवलं गेलं तेव्हा तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आपल्याला नुकतंच एक बाळ झालंय आणि त्यामुळेच खूप बिझी आहे, असं अंतरानं म्हटलं.