www.24taas.com, नवी दिल्ली
‘सलामें इश्क मेरी जान जरा कबूल कर ले, तू हमसे प्यार करने कि जरासी भूल कर ले’ म्हणत सगळ्यांवरच रेखानं मोहिनी घातली... आणि भले भले ही सुंदर ‘भूल’ करून बसले... आज रेखा वयाची ५८ वर्षे पूर्ण करतेय पण, आजही रेखाची ही मोहिनी तिच्या चाहत्यांवर कायम आहे.
रेखा... खरं नाव भानुरेखा गणेशन... पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव चटकन आठवणार नाही. बेबी रेखा या नावानं तिनं प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि बॉलिवूडमध्ये हीच रेखा सगळ्यांना घायाळ करत आपल्या पायावर भरभक्कमपणे उभीही राहिली. तिच्या सौदर्यावर न भाळलेली व्यक्ती दुर्मिळच... तिच्या अभिनय क्षमतेचा आवाका इतका मोठा आहे की आजपर्यंत कोणताही कॅमेरा त्याला कॅच करू शकलेला नाही... ना कोणत्या दिग्दर्शकाला ती कला साधता आली...
भानुरेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला झाला. घरच्या परिस्थितीमुळे नाखुशीनंच तिनं तमिळ चित्रपट ‘रंगुला रत्नम’द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. तिला आजही बालपणीचे ते दिवस नकोसे वाटतात. खेळा-बागडायच्या वयात तोंडाला रंग फासून, चित्रविचित्र कपडे घालून कॅमेऱ्यासमोर वावरणं तिला मुळीच आवडत नव्हतं. पण, यामुळेच ती १९७० साली हिंदी सिनेमा ‘सावन भादो’मध्ये झळकली. चेहऱ्यावर एक प्रकारची मादकता आणि त्याचसोबत एक सोज्ज्वळपणा... तिच्या चेहऱ्यावरचे भाव कोणत्याही प्रकारच्या भूमिकेसाठी नेहमीच उठावदार ठरले. कॅमेऱ्यासमोर उभी राहिली तर त्याचीही ‘बोलती बंद’ करायची क्षमता तिला चांगलीच साधली. हिंदी सिनेमात ४२ वर्षांहून अधिक काळ घालवणारी रेखानं आपल्या सौदर्यांच्या आणि बोलक्या डोळ्यांच्या जोरावर अनेकांना आकर्षित केलं. अनेक फिल्म समीक्षकांनी तिला ‘संपूर्ण अभिनेत्री’ चा किताब बहाल केलाय.
१९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’नं रेखाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तिनं आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. तिच्या प्रत्येक भूमिकेत तीनं आपलं वेगळेपण सिद्ध् केलं. शाहरुख खानच्या ‘ओम शांति ओम’ (२००७) या चित्रपटात रेखा प्रेक्षकांना शेवटचं दिसली होती.
अमिताभ बच्चन आणि रेखाच्या जोडीला आजही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंय. ही जोडी बॉलिवूडमधली हीट जोडी ठरली होती. अभिताभ बरोबर चित्रीत झालेला ‘सिलसिला’ सुपर डूपर हीट सिनेमा ठरला होता. संयोगाची गोष्ट म्हणजे, आज रेखाचा वाढदिवस आहे आणि बीग बी अमिताभ यांचा उद्या म्हणजे ११ ऑक्टोबरला...
खरं तर, `दे दुआँए मुझे उम्रभर के लिए...` असं म्हणायची रेखाला काही गरज लागणार नाही कारण तिचे सगळेच चाहते तिच्यावर या `दुआँए` ओवाळून टाकायला ५८ वर्षांनंतरही तयार आहेत... आणि हीच तर रेखाची खासियत आहे.