www.24taas.com, मुंबई
कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ हा कॉमेडी सिनेमा तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रदर्शित होतोय... तोही डिजिटल स्वरुपात... यासाठी कुंदन शाह यांचा उत्साह तर पाहण्यासारखा आहे. त्यांच्यासाठी हा एक ‘ऐतिहासिक क्षण’ ठरलाय.
‘जाने भी दो यारो हा सिनेमा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झलकणार आहे. आम्ही ही फिल्म बनवताना छोट्या बजेटमध्ये बनवली होती तरीही ती चांगली चालली होती. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर जाताना खूप बरं वाटतंय’ असं म्हणत कुंदन शाह यांनी आपला आनंद व्यक्त केलाय. ‘हा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित होतोय. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ही माझ्या आयुष्यातली एक मोठी मिळकत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता ३० वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा हा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकतोय’ असं शाह यांनी म्हटलंय. पीव्हीआर अध्यक्ष आणि एनएफडीसी (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्या प्रयत्नांतून २ नोव्हेंबर रोजी ‘जाने भी दो यारो’ आता डिजीटल स्वरुपात देशभरातील पीव्हीआर सिनेमागृहांत प्रदर्शित करण्यात येणार आहे.
जाने भी दो यारो ही दोन मित्रांची कहाणी... दोघंही सामान्य, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ फोटोग्राफर... या भूमिका निभावल्यात नसीरुद्दीन शाह आणि रवी वासवानी यांनी... एक खून होताना हे दोघंही पाहतात आणि एका मोठ्या संकटात सापडतात... आणि मग होते खरी कहाणी सुरू... १९८३ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा तुम्ही अजून पाहिला नसेल तर पुढे काय काय घडतं हे तुम्ही स्वत:च पाहण्यासाठी जाणं सोयिस्कर...