www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. अंधेरी इथल्या कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटमध्ये आपटेंनी अखेरचा श्वास घेतला.
आज सकाळी ११ वाजता अंधेरीतील शास्त्रीनगरमधील राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ओशिवरा स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कसदार अभिनेता, कल्पक दिग्दर्शक आणि निर्माता अशी विनय आपटेंची ओळख होती. सिनेमा, नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनयाची छाप पाडली.
हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. जोगवा, येड्यांची जत्रा, खबरदार, ताऱ्यांचे बेट हे त्यांचे गाजलेले मराठी सिनेमे... सत्याग्रह, आरक्षण, कॉर्पोरेट, चांदनी बार, एक चालीस की लास्ट लोक, इट्स ब्रेकिंग न्यूज, धमाल अशा अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या..
कबड्डी कबड्डी, फायनल ड्राफ्ट, कुसुम मनोहर लेले ही त्यांची नाटके प्रचंड गाजली. एका लग्नाची दुसरी गोष्ट, आभाळमाया, अग्निहोत्र या त्यांच्या गाजलेल्या मराठी मालिका... मधुबाला, अदालतसारख्या हिंदी टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या..
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत विनय आपटे यांच्या पॅनलनं मोहन जोशी पॅनलला कडवं आव्हान दिलं होतं. ती निवडणूक प्रचंड गाजली होती. दूरदर्शनच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी अनेक मालिकांमध्ये अभिनय केला, तसंच दिग्दर्शनही केलं. अनेक नव्या कलावंतांना त्यांनी अभिनयाची संधी दिली. सिने-नाट्यसृष्टीत अनेकजण त्यांना गुरू मानत... आयएनटीसारख्या एकांकिका स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.
“विनय आपटे यांच्या निधनामुळं रसिक विनयशील कलावंताला अंतरले”, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.