फिल्म रिव्ह्यू : `कांची`... घईंची फसलेली रेसिपी

बनवायचं होतं काहीतरी वेगळं पण, मिश्रणातून बनलं काहीतरी भलतंच... असंच काहीसं घडलंय सुभाष घईंच्या `कांची` या सिनेमाचं...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 26, 2014, 03:40 PM IST


चित्रपट : कांची
दिग्दर्शक : सुभाष घई
प्रमुख कलाकार : मिष्टी, कार्तिक आर्यन, ऋषी कपूर, मिथून चक्रवर्ती, ऋषभ सिन्हा,
संगीतकार: सलीम आणि सुलेमान, इस्माइल दरबार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बनवायचं होतं काहीतरी वेगळं पण, मिश्रणातून बनलं काहीतरी भलतंच... असंच काहीसं घडलंय सुभाष घईंच्या `कांची` या सिनेमाचं... मुक्ता आर्टसच्या या नव्या सिनेमाचे पोस्टर्स आणि प्रोमो पाहून काहीतरी सामाजिक क्रांती किंवा स्त्री शक्तीचं आवाहन अशी काही अपेक्षा तुम्ही करत असाल तर तुमचा खूप मोठा अपेक्षाभंग होण्याची मोठी शक्यता आहे.
दिग्दर्शक सुभाष घईंची `कांची`
सिनेमाच्या ओपनिंग शॉटपासून ते क्लायमॅक्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी जसं काही या सिनेमावर सुभाष घईंच्या नावाचं लेबल लावल्याप्रमाणे ठासत राहत की ही सुभाष घईंचाच सिनेमा आहे. उंचच उंच अशा पर्वतरांगांच्या दरम्यान फुलते एक निरागस प्रेमकथा... हिरोची दुर्घटना वाटावी अशी हत्या, `बल मिनिंग`च्या गीतांवर नाचणारे-गाणारे खलनायक, बदला घेण्यासाठी हिरोईननं आपल्या सौंदर्यांचा केलेला वापर आणि क्लायमॅक्समध्ये खलनायकानं बंधक बनलेले इतर नातेवाईक... असा सगळा मसाला या सिनेमात पाहायला मिळतो.

काय आहे कथानक
सिनेमाची कथा फुलते ती उत्तराखंडच्या कोशंपा नावाच्या गावात... इथं बहुतेककरून निवृत्त सैनिकांचे परिवार राहतात. बिंदा (कार्तिक आर्यन) गावातच तरुण-तरुणींची फौज तयार करण्यासाठी शाळा चालवतोय. कांची (मिष्टी)सोबत त्याचं प्रेम थोडं खट्याळपणा करणारं... कांची थोडी रागीट, थोडी निडर... त्यामुळे ती गावातच चुकीचे धंदे करणाऱ्यांना आडकाठी करते. कोशंपावर एका राजकारणातल्या बिल्डर कुटुंबाची तर कांचीवर याच कुटुंबाच्या मुलाची (ऋषभ सिन्हा) वाईट नजर आहे.
कांचीचं लग्न बिंदाशी योजिलं जातं तेव्हा बिल्डर कुटुंबातला मुलगा बिंदाला ठार मारण्याचा प्रयत्न करून मुंबईला पळून जातो. याचा बदला घेण्यासाठी कांची मुंबईला पोहचून त्या कुटुंबाचा शोध घेते आणि त्यांचं राजकीय आणि व्यावसायिक जीवन संपवते... आणि पुन्हा आपल्या गावाला परतते.

कथा आणि सामाजिक आशय
या संपूर्ण कथेत एका एनजीओचाही उल्लेख आहे जी आपल्या पद्धतीनं भ्रष्टाचार मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्यासोबतच कांची आपला उद्देश साध्य करण्यात यशस्वी होते. राजकारण, जमीन, एनजीओ, गुन्हे आणि एका महिलेचा बदला अशी सगळी सरमिसळ सिनेमाला शेवटाकडे नेते... मग, आपसूकच यामध्ये थोडेफार आदर्श येतातच.
सिनेमाची ट्रीटमेंट आणि हिरोईनचा ड्रेसिंग सेन्समधली कांची बऱ्याचदा `ताल` सिनेमाकडून प्रेरणा घेतल्यासारखी वाटते. परंतु, त्यानंतर हिरोईनच्या मुखातून शिव्यांचा पाऊस आणि तिच्या हाताचे फटके मिष्टी नवी ऐश्वर्या असल्याचा तुमचा भ्रम तोडून टाकते.
मिथुन चक्रवर्तीचा राजकारणी नेता आणि बिल्डरच्या रुपातील ऋषी कपूरच्या रोमान्टिक मख्खपणा तुम्हाला थोडाफार आनंद नक्कीच देतो. तर पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात चंन राय सान्याल आपलं टायमिंग सेन्स नक्कीच भाव खाऊन जातो.

शेवटी काय तर....
`कांची`चा साऊंड इफेक्ट उत्तम आहे तसंच सुधीर चौधरी यांची सिनेमॅटोग्राफीही कौतुकास्पद आहे. इरशाद कामिलची गीतंही सहज आहे. एडिटिंगमध्ये थोडा मार खाल्लेल्या `कांची`वर आणखी थोडी मेहनत घेतली असती तर या सिनेमानं सुभाष घईंच्या जुन्या सिनेमांची नक्कीच आठवण करून दिली असती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.