सिनेमा - इश्क इन पॅरिस
दिग्दर्शक - प्रेम राज
प्रोड्युसर - प्रीती झिंटा
कलाकार - प्रीती झिंटा, रेहान मलिक, सलमान खान
संगीत - साजिद - वाजिद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोल्जर सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बबली गर्ल प्रिती झिंटा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालीय. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीन असलेल्या प्रितीला प्रदीर्घ काळानंतर सिनेमातून कमबॅक करण्यासाठी वेळ मिळालाय.
‘इश्क इन पॅरीस’ नावातूनच या सिनेमात प्रेमाच्या रंग पसरलेत याची ओळख होतेय. सिनेमा बऱ्यापैकी जमला असला तरी बॉलिवूड फिल्म्समध्ये आढळणारा ‘मसाला’ या सिनेमात नाही. सिनेमाचं शूट पॅरीसमध्येच झाल्यामुळे तिथल्या सुंदर सुंदर जागांचं सिनेमाच्या माध्यमातून दर्शन मात्र नक्कीच होतं. पण, पटकथाचं दमदार नसल्यानं दिग्दर्शकांना फारस यश मिळालेलं नाही.
सिनेमाचं कथानक
रोमहून पॅरिसला जात असताना दोन अनोळखी व्यक्तींची - आकाश (रेहान मलिक) आणि इश्क (प्रीती झिंटा)ची एकमेकांशी ओळख होते. एक सुंदर संध्याकाळ एकमेकांबरोबर व्यतीत करण्याची संधी या दोघांना मिळते आणि आपण बनवलेल्या काही नियमांना समोर ठेवताना दोघांचे मार्ग वेगवेगळे होतात.
इश्क म्हणजेच प्रीती झिंटा आपल्या नियमांवर दटून राहणारी, पक्क्या विचारांची एक मुलगी आहे. आपल्या भूतकाळाला बरोबर घेऊन भविष्याची वाटचाल करणं तिला मान्य नाही. परंतू आकाश मात्र इश्कला विसरू शकत नाही. दोघंही पुन्हा एकदा समोरासमोर येतात ते प्रेमनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरीसमध्ये...
पटकथेचा बाज आणि कलाकारांची साज
एका सहजरित्या व्यक्त होणाऱ्या पटकथेत कथेची मांडणी करण्यात आलीय. परंतू प्रीतीनं मात्र प्रेक्षकांची घोर निराशा केलीय. ती उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते मात्र या सिनेमात तिचा अभिनय उठून दिसत नाही. सिनेमाच्या बहुतांशी भागात ती शो-पीस म्हणून दिसते.
अभिनेता रेहान मलिक याचा मात्र ही पहिलाच सिनेमा... पण, तोही फारसा प्रभावी वाटत नाही. कथेतील परिस्थितीनुसार आलेले हावभाव मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही.
या सिनेमात सलमान खाननंही एक छोटासा कॅमियो केलाय. गेल्या वर्षभराच्या काळात त्याच्या फॅन्सला तो सिनेमात दिसला नव्हता... त्यामुळे हा छोटासा भागही त्यांच्यासाठी पर्वणीच असेल.
उत्कृष्ट चित्रिकरण
‘इश्क इन पॅरिस’ उत्कृष्ट पद्धतीनं चित्रीत करण्यात आलाय. सिनेमाचा लुक आणि जाणीवा यांना जास्त महत्त्व दिल्याचं सिनेमातील काही दृश्यांतून स्पष्ट दिसून येतं.
सिनेमातील संगीत
सिनेमातील संगीत फारसं प्रभावी नसलं तरी ऐकण्यासाठी चांगलं वाटतं. सुनीधी चौहान, श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचा आवाज कानाला सुमधूर भासतो.
सिनेमाचं म्हणाल, तर तुम्ही एकदा मात्र हा सिनेमा नक्की पाहू शकता. गुड फील असलेली या लव्ह स्टोरीसोबत पॅरीसही फिरून आल्यासारखं वाटेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.