प्लास्टिक सर्जरीवर अनुष्कानं उघडले आपले `ओठ`

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपल्या ओठांमुळे खूप वैतागलेली दिसतेय. याचं कारण म्हणजे, करण जोहरच्या `कॉफी विथ करण` या कार्यक्रमात तिचा नवा लूक दिसल्यानंतर तिच्या ओठांवर चर्चा सुरू झाली होती. काहींनी तर याला हास्यात्मक वळण देण्याचाही प्रयत्न केला होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 11, 2014, 03:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपल्या ओठांमुळे खूप वैतागलेली दिसतेय. याचं कारण म्हणजे, करण जोहरच्या `कॉफी विथ करण` या कार्यक्रमात तिचा नवा लूक दिसल्यानंतर तिच्या ओठांवर चर्चा सुरू झाली होती. काहींनी तर याला हास्यात्मक वळण देण्याचाही प्रयत्न केला होता.
`कॉफी विथ करण` या कार्यक्रमात अनुष्काचे ओठ तिचा संपूर्ण लूक बदलवून टाकणारे दिसत होते. यामुळेच, अनुष्कानं आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया करून आपल्या ओठांचा आकार बदलवून घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.
यावर आपली भूमिका स्पष्ट करताना अनुष्कानं आपण कोणताही `लिप जॉब` म्हणजेच ओठांवर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली नसल्याचं म्हटलंय. यासोबतच `मला प्लास्टिक सर्जरीवर अजिबात विश्वास नाही आणि मी जशी आहे तशीच अगदी खुश आहे... मला आशा आहे की माझ्या या बोलण्यावर लोक विश्वास ठेऊन माझी टर उडवणं बंद करतील` असंही वैतागलेल्या अनुष्कानं म्हटलंय.
'हा माझा निर्णय आहे आणि मी माझ्या ओठांना १९६०-७० च्या दशकाच्या धर्तीवर निर्माण होत असलेल्या 'बॉम्बे वेलवेट'साठी हा लूक स्वीकारलाय. या सिनेमात मी जॅझ गायिका बनलेय. त्यावेळेला अनुसरुन हा लूक ठरवला गेलाय. 'कॉफी विथ करण'मध्ये माझा लूक फक्त ओठांमुळे नाही तर आणखीही कारणांमुळे वेगळा दिसतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतात. मला असं वाटत होतं की या एपिसोडमध्ये मी चांगली दिसत होते? नाही. मला वाटलं की मी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं केल्या' असं म्हणत अनुष्कानं आपल्या टीकाकारांना चांगलंच फैलावर घेतलंय.
अनुष्कानं ट्विटरवर आपलं म्हणणं मांडलंय. `माझ्यासाठी माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलणं नेहमीच कठिण होऊन जातं त्यामुळेच मी या सगळ्यापासून स्वत:ला दूर ठेवलंय. याऐवजी मी ट्विटरवर तुम्हा सगळ्यांसी आपले विचार, जे बऱ्याचदा टूकार वाटतात... शेअर करणं पसंत करते. कारण मला हे योग्य वाटतं` असंही तिनं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.