`किशोरदां`च्या नावाची आजही जादू!

आपल्या जादूई आवाजाने चाहत्यांना स्वर्गीय सुखाचा आनंद देणाऱ्या किशोरकुमार यांची आज ८४ वी जयंती... एक गायक-अभिनेता-गीतकार-निर्माता आणि दिग्दर्शक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या सदाबहार कलावंताला ‘झी मीडिया’चा सलाम...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 4, 2013, 11:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या जादूई आवाजाने चाहत्यांना स्वर्गीय सुखाचा आनंद देणाऱ्या किशोरकुमार यांची आज ८४ वी जयंती... एक गायक-अभिनेता-गीतकार-निर्माता आणि दिग्दर्शक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या सदाबहार कलावंताला ‘झी मीडिया’चा सलाम...
प्रत्येक चाहत्याला स्वर्गीय सुखाचाच जणू आभास व्हावा, असा हा आभास कुमार गांगुलींचा आवाज... म्हणजेच अर्थातच आपले किशोरदा... ४ ऑगस्ट १९२९ रोजी बंगालच्या खांडवामध्ये जन्मलेल्या किशोरदांनी आपले बंधू अशोककुमार यांच्यासोबत १९४५ च्या दरम्यान मुंबईत बॉम्बे टॉकीजमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि सुरवातीची धडपड जिद्दीने पार करत अल्पावधीतच आपल्या जादूई आवाजाने संपूर्ण सिनेसृष्टीला दखल घ्यायला भाग पाडलं.
१९५८ मध्ये आलेल्या ‘चलती का नाम गाडी’पासून किशोरदांची गाडीही सुसाट धावायला लागली. त्यानंतर पडोसनमधला त्यांचा अभिनय आणि त्यातली गाणी आजही सर्वांनाच वेड लावतात. किशोरदांनी एक उत्तम अभिनेता व्हावं, असं अशोककुमार यांना वाटे. मात्र, किशोरदांचा कल गायक होण्याकडेच होता.

मराठीतही त्यांनी अश्विनी येना म्हणत आपल्या दमदार आवाजाची झलक दाखवली. हिंदीबरोबरच भोजपुरी, कन्नड, गुजराती, ऊर्दू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या किशोरदांना लता मंगेशकर पुरस्काराबरोबरच तब्बल आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं, की जो एक विक्रम समजला जातो.
चौघा भावंडांमध्ये सर्वात लहान असणाऱ्या किशोरदांनी कामगिरी मात्र अचाट करून दाखवली. अशा या अष्टपैलू, हरहुन्नरी आणि तितक्याच हजरजबाबी कलावंताने १३ ऑक्टोबर १९८७ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी अचानक एक्झिट घेतली आणि मागे ठेवल्या त्या केवळ सुरांच्या आठवणी...
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.