www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेता विवेक ओबेरॉयविरूद्ध सर्व्हिस टॅक्स थकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक ओबेरॉयनं चित्रपट निर्माते आणि चित्रपट निर्मिती कंपन्यांकडून पैसे घेतले, त्यासोबत सर्व्हिस टॅक्सचीही आकारणी केली. मात्र हा सर्व्हिस टॅक्स त्यानं सेवा कर संचालनालयाकडं भरलाच नसल्याचं उघड झालंय.
सर्विस टॅक्स खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत विवेक ओबेरॉयनं जवळपास ५० लाख रूपयांचा सर्व्हिस टॅक्स चुकवला नसल्याचं स्पष्ट झालंय. सर्व्हिस टॅक्स विभागाचे उपायुक्त समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक ओबेरॉयवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व्हिस टॅक्स आयुक्त कार्यालयाकडून त्यांना त्याचे संपूर्ण हिशेब आणि त्यातील सेवाकराचं विवरण सादर करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.
विवेकच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून त्यानं सर्व्हिस टॅक्स कायद्याचं उल्लंघन केल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय विवेकनं अद्याप सर्व्हिस टॅक्स खातंही उघडलं नसल्याचं स्पष्ट झालंय.
पंतप्रधान असलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी ते अर्थमंत्री असताना, १९९४मध्ये सर्व्हिस टॅक्स आकारणीची सुरूवात भारतात केली होती. त्यावेळी काही ठराविक सर्व्हिसवरच सर्व्हिस टॅक्सची आकारणी होत असे, मात्र त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२मध्ये सर्व प्रकारच्या सेवांवर सर्व्हिस टॅक्स आकारणीला सुरूवात केली. भारत सरकारच्या सध्याच्या सर्व्हिस टॅक्स कायद्यानुसार सरकारनं निश्चित केलेल्या सर्व प्रकाराच्या सेवा व्यवहारावर सेवा देणाऱ्यानं १२.३६ टक्के एवढा सर्व्हिस टॅक्स भरणं बंधनकारक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.