अगदी परवाचीच गोष्ट. घरी एक कुरिअरवाला आला होता. वय साधारण ३६च्या आस-पास. मला बघितल्यावर खूप बोलायला लागला. म्हणाला, मी जळगावहून मुंबईत आलेलो अभिनेता बनायला. माझ्यात खूप टॅलेंट आहे. आजही संधी मिळाली तर मी माझी नोकरी सोडून या क्षेत्रात येईन.... मला हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं. असे स्ट्रगलर्स बऱ्याच ठिकाणी भेटतात. आणि मग मला स्वतःलाच जाणवतं, की आपण खरंच किती नशीबवान आहोत...
‘अपुर्वा नेमळेकर रुपारेल कॉलेजला होती, म्हणजे ती अभिनय क्षेत्रात आली, तर त्यात आश्चर्य काय?’ अशी प्रतिक्रिया ऐकली की हसायलाच येतं. आमच्या रुपारेलला अभिनेत्यांची चांगली परंपरा आहे. पण, खरं सांगू का..माझ्या संबंध आयुष्यात अभिनय क्षेत्राशी माझा काडीचाही संबंध आला नव्हता.
या सगळ्या प्रवासाचा मी आता विचार करते तेव्हा मला खरंच प्रश्न पडतो की हे सगळं घडलं कसं? कोण होते मी ?
'किंग जॉर्ज'मध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी बँड्राच्या 'नॅशनल कॉलेज'ला आर्ट्सला अॅडमिशन घेतली. तेव्हापासूनच मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवून टाकलं होतं. त्यामुळे 'एचएसबीसी'ला बॅक ऑफिसमध्ये काम मिळवलं. बारावीनंतर रुपारेल कॉलेजमध्ये बीएमएसला अॅडमिशन घेतली. तेव्हा नृत्त्याशी काहीच संबंध नसतानाही मी माझ्या एका मैत्रिणीला बरोबर घेऊन डान्स क्लास सुरू केला होता. माझी मैत्रीण मुलांना डान्स शिकवायची आणि मी अॅडमिनचं काम संभाळायचे.
पुढे बीएमएसला प्रवेश घेतल्यावर एकीकडे 'कंस्ट्रक्शन बिझनेस'च्या एक्झिबिशन्सचं काम सुरू केलं. हिरानंदानी, लोढा बिल्डर्सबरोबर खूप काम करायला मिळालं. 'लोढा बिल्डर्स'बरोबर तर काँट्रॅक्ट करून मी वर्षभर एक्झिबिशन्स केली. त्यांचे कितीतरी प्रोजेक्ट्स मी लाँच केलेत. स्वतःचे काँटॅक्ट्स बनवले, वाढवले. त्यातून तिकडच्या मॅनेजर्सच्या मुलांच्या वाढदिवसांचे इव्हेंट्स मिळवले. ही कामं इतकी वाढली की पुढे मी माझी 'अपूर्वा नेमळेकर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी'च सुरू केली. नंतर एक वेळ अशी आली की माझं ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच माझ्या हाताखाली ५०-६० मुलं काम करत होती.
या सगळ्या धावपळीत कॉलेजला नियमीतपणे जाणं जमत नव्हतं. पण, कॉलेजच्या प्रोफेसर्सनी मला खूप सहकार्य केलं. बऱ्याच वेळा मी केलेल्या कामाची सर्टिफिकेट्स कॉलेजमध्ये सबमिट करायचे. त्यामुळे, कॉलेजनेही मला कधी आडकाठी केली नाही. उलट, त्यांना माझं कौतुक वाटायचं.
पण, भविष्यात मी नक्की काय करेन याबद्दल ते ही साशंकच होते. एकदा एका प्रेफेसरांनी मला विचारलं, की तुला आयुष्यात नक्की काय करायचंय ? मी उत्तर दिलं, “ नक्की माहीत नाही. पण, मिळालेली कुठलीच संधी सोडणार नाही. जे समोर येईल ते करणार.” मला वाटतं, आयुष्य प्लॅन करण्यापेक्षा येणारी संधी स्वीकारण्याचा माझा स्वभावच मला इथपर्यंत घेऊन आला.
या सगळ्या प्रक्रियेत मला कॉलेज लाईफ जगायला नाही मिळाली. शिवाजी पार्कचा कट्टा अनुभवला नाही. कँटीनमध्ये धमाल केली नाही... पर, कोई गम नही. १९-२० या वयातच आयुष्यात काहीतरी करून दाखवण्यची खरी जिद्द आणि जी ताकद असते. ते इन्स्टिंक्ट मी टाईमपास करण्यात वाया न घालवता पुरेपूर वापरलं. सो, मी खूप खूष आहे.
बीएमएस पूर्ण झालं. आता पुढे एमबीए करायचा प्लॅन होता. माझा इंटरेस्ट होता तो आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात. त्यासाठी लंडनला जायचं ठरवलं. घरच्यासाठी हा धक्काच होता. पण, माझा निर्णय पक्का होता. अॅडमिशनही मिळाली. नोव्हेंबरमध्ये जायचं ठरलेलं, पण काही कारणामुळे ते पोस्टपोन्ड झालं. जानेवारीत जायचं ठरलं.
आणि नोव्हेंबरमध्ये एक गंमत घडली आणि आयुष्य ग्लॅमरस झालं. माझे फेसबुकवरचे फोटोज पाहून मला चक्क एका सिरीयच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं.... ते सगळं कसं घडलं. त्याबद्दलही तुमच्याशी बोलायचं आहे… पण, ते पुढच्या ब्लॉग मध्ये…
शव्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर