मराठीत अभिनेते एकसे एक आहेत, यात काही वाद नाही. पण, हिरो ?
लोक आज हिंदी सिनेमाच्या हिरोंना फॉलो करतात. त्यांच्या अभिनयाचीच तरुणांना भुरळ पडते असं नाही, तर एकुणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर ते फिदा असतात. त्यांचा रुबाब, पिळदार शरीरयष्टी लोकांना भावते. त्यांचं फिजीक, त्यांची स्टाईल, त्यांचा लूक सगळंच आकर्षित करून घेणारं असतं. मराठीत मला असं वाटतं की या टाईपचे नायक झालेच नाहीत.
आपल्याकडे सिनेमात एकतर गावरान विषयांना महत्त्व दिलं गेलं नाही तर विनोदी सिनेमांना. दोन्ही प्रकारच्या सिनेमांत लोकांसमोर आलेले नायक हे तब्येतीने धष्टपुष्ट, ताकदवान, स्टाईलीश असण्याचा प्रश्नच नव्हता. हे सिनेमे चालत असले तरी यातल्या हिरोंना फॉलो करावं असं तरुणांना वाटलं नाही. पण, याचवेळी सलमान खान, हृतिक रोषन, संजय दत्त जॉन आब्रहम यांच्या देहयष्टीवर फिदा होणारा आणि त्यांच्यासाठी सिनेमा बघणारा नवा प्रेक्षकवर्ग जन्माला येत होता. मराठी सिनेमा गावाकडून शहराकडे हळूहळू सरकतोय. स्टाईलीश होत चाललाय. अशावेळी मराठी हिरोंनीसुद्धा स्वतःच्या फिजीकल स्टाईलचा, ऍटीट्युडचा नव्याने विचार करायला हवा. आपली क्रेझ निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत.
मी स्वतः बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये, सिरीयल्समध्ये काम केलं असल्यामुळे हिंदीतल्या अभिनेत्यांचं आपल्या फिटनेसबद्दल असलेलं प्रेम पाहिलं. डाएट, जिम, बॉडीबिल्डींग याबद्दल ते जेवढे अलर्ट असतात, तेवढे मराठी अभिनेते नाहीयेत. यामुळेच मराठीत स्टार्स निर्माण झाले नाहीत. पण, नवा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी खुद्द मराठी अभिनेत्यांनी आपला लूक बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
'स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे' या माझ्या नुकत्याच येऊन गेलेल्या सिनेमात माझ्या कामाचं जितकं कौतुक झालं, तितकंच माझ्या लूकचं, स्टाईलचं आणि फिजीकचंही कौतुक झालं. या सिनेमाचे दिग्दर्शक मला म्हणाले होते, “या सिनेमासाठी आवश्यक असलेला चेहरा तू आहेस. पण ‘मराठा मर्द मराठा’ या गाण्यासाठी अपेक्षित असणारा रांगडा पण स्टाईलीश लूक हवा आहे. त्यासाठी एक्स्ट्रा वर्क आऊट करून बॉडी बिल्ट आप करशील का?” मला वाटतं माझ्या कॅरेक्टरची ही गरज होती आणि त्याप्रमाणे मी जिममध्ये जाऊन कसायला सुरूवातही केली. आणि त्याने खरंच फरक पडला... फक्त माझाच नाही तर सिनेमाचा लूकही बदलून गेला. अतुल कुलकर्णीनेही नटरंगसाठी शरीरावर खास लक्ष दिलं होतंच ना! तुम्हीही फिटनेसकडे लक्ष द्या. हिरो व्हायचं असेल किंवा नसेलही. पण, फिटनेस हा हवाच, नाही का ?
शब्दांकन- आदित्य नीला दिलीप निमकर