झी २४ तासचा विशेष उपक्रम: ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’

Updated: Aug 12, 2015, 01:41 PM IST
झी २४ तासचा विशेष उपक्रम: ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’ title=

‘झी २४ तास’ ही मराठीतील आघाडीची वृत्तवाहिनी आपल्या सामाजिक बांधिलकीसाठीही महाराष्ट्राला परिचित आहेच. अनन्य सन्मान, संघर्षाला हवी साथ, पाणी वाचवा, प्रदूषणमुक्त दिवाळी यासारखे अनेक उपक्रम व्रतस्थ पद्धतीने ‘झी २४ तास’ राबवतं असतं. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षापासून आम्ही ‘धागा शौर्य का, राखी अभिमान की’ हा नवा उपक्रम राबवणार आहोत. देशाचा स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन या दोन सणांच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम वाढावे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.

मोठ्या धाडसाने, शौर्याने, आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणा-या वीर सैनिकांना महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातील विद्यार्थ्यांची १० हजार पत्रे पाठवण्याचा आमचा संकल्प आहे. या उपक्रमाचा शुभारंभ माजी सैनिक आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या उपक्रमाला संरक्षणमंत्री श्री. मोहन पर्रिकर यांचेही आशीर्वाद लाभणार आहेत. सिने सृष्टीतील अनेक कलाकार, महाराष्ट्रातील विचारवंतही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.    

महाराष्ट्राच्या सर्वच विभागातील काही निवडक शाळांमध्ये ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या काळात आम्ही विद्यार्थ्यांकडून ही पत्रे संकलित करणार आहोत. झी २४ तासच्या स्थानिक जिल्हा प्रतिनिधीकडे शाळांनी नोंदणी केल्यानंतर या शाळांमध्ये आम्ही एक बॅनर आणि पत्र संकलनासाठी एक सुशोभित पेटी ठेवणार आहोत. शूरवीर जवानांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील आदराची भावना स्वतंत्रपणे त्यांनी स्वत: पोस्टकार्डवर लिहावी, ही अपेक्षा आहे. यापैकी काही निवडक शाळांचे चित्रीकरण आम्ही ‘झी २४ तास’वरून दाखवणार आहोत.

यातील काही निवडक पत्रांना आम्ही ‘झी २४ तास’वर विशेष कार्यक्रमातून प्रसिद्धीही देणार आहोत. तसेच महाराष्ट्रातून एकत्र जमा झालेली ही पत्रे आम्ही प्रत्यक्ष सीमेवर जाऊन सैनिकांना देणार आहोत. या विद्यार्थ्यांच्या पत्राबाबत सैनिकांच्या भावनाही आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी एका विशेष कार्यक्रमातून ‘झी २४ तास’वर दाखवणार आहोत. 

राज्यभरातून येणा-या या पत्रांतील निवडक, चांगल्या १०० पत्रांचे एक पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत. हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींना, राज्य तसेच दिल्लीतील मराठी अधिका-यांना आणि शाळांनाही पाठवण्याचा आमचा मानस आहे.

आमच्या या उपक्रमात आपल्या शाळेनेही सहभागी व्हावे, ही आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर देशप्रेमाचा संस्कार रूजवण्यासाठी या उपक्रमामध्ये आपल्याही शाळेचं योगदान असावं, ही विनंती. आपल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो. 

डॉ. उदय निरगुडकर
मुख्य संपादक, ‘झी २४ तास’    
        

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.