हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य!

Updated: Jan 11, 2017, 03:43 PM IST
हुतात्मा दिन : स्वातंत्र्यापूर्वीच या शहरानं अनुभवलं स्वातंत्र्य! title=

सतिश सूरेश तमशेट्टी, सोलापूर

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे... मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. 

पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा...

या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८-९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावावर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलना दरम्यान दि. ९-१०-११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. 

भारतातील 'स्वतंत्र' (काही काळासाठी) झालेला असा हा पहिला भाग! मे - जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस 'मार्शल लॉ' हा कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या चार निरपराध युवकांना फाशी देण्यात आले.

अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदेहे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते.

पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन 'केसरी'मध्ये आढळतात. १२ जानेवारी १९३१ रोजी या लढ्यातील चार वीर फाशी गेले. आजही तो दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.