महापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..

Updated: Nov 16, 2016, 07:59 PM IST
महापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...! title=

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..

पिंपरी चिंचवडच्या लढाईत सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लागलीय ती अजित पवार यांची. गेली २० वर्ष शहरावर एक हाती वर्चस्व असलेल्या अजित पवार यांना त्यांच्याच चेल्याकडून कडवं आव्हान निर्माण झालं आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार यांचा शब्द पिंपरी चिंचवडमध्ये प्रमाण मानला जायचा. पण आता परिस्थिती बदललेली आहे. अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडत त्यांना कडवे आव्हान निर्माण केलंय. बारामती नंतरचा राष्ट्रवादीचा गड म्हणून पाहिल्या जात असलेल्या पिंपरी चिंचवडची सत्ता राखणे त्या साठीच अजित पवार यांच्यासाठी महत्वाचं आहे. 

मुंबईतली महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या मुकुटातला शिरपेच आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादीसाठी पिंपरी चिंचवड मधली सत्ता प्रतिष्ठेची आहे. पिंपरी चिंचवडमधली सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली तर अजित पवारांच्या नेतृत्वावरचं प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यात नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीची महापालिकेची सत्ता राखण्यात गणेश नाईक यांना यश आले आणि त्यांचं शहरावरचे नेतृत्व मान्य झाले. केंद्र आणि राज्यातील सत्तांतर होऊन आता बराच कालावधी गेला आहे. त्यामुळं भाजपची हवा ही ओसरली आहे.  अश्या स्थितीत ही जर अजित पवार यांना जर सत्ता राखता आली नाही तर त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येणार आहे...!

अजित पवार यांच्या प्रमाणेच महापालिका निवडणुकीत भाजपच्या लक्ष्मण जगताप यांची प्रतिष्ठा ही पणाला लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची साथ सोडत भाजपच्या तिकिटावर आमदार झालेल्या लक्ष्मण जगताप यांना आता थेट त्यांचे गुरु असलेल्या अजित पवार यांच्याशी लढाई करावी लागणार आहे. मुळात लक्ष्मण जगताप यांचा चिंचवड मतदार संघ हा गड मानला जातो. पण त्याच मतदार संघात लोकसभेमध्ये त्यांना मोठा फटका बसला होता. आणि हक्काची मते असताना विधानसभेत त्यांना भाजपचा आसरा घ्यावा लागला होता. त्यामुळं त्यांचीही पूर्वी प्रमाणे चिंचवडवर पकड नसल्याचे स्पष्ट होतेय. अश्या स्थितीत शहराध्यक्ष असलेल्या जगताप यांच्या नेतृत्वात भाजप निवडणुका लढवतीय. 

भाजपचा विश्वास सार्थ ठेवतानाच कोणत्या ही परिस्थितीत त्यांची साथ न सोडणाऱ्या नगरसेवकांच्या विजयाची हमी ही घ्यावी लागणार आहे. अजित पवार यांच्याशी मुकाबला करतानाच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाल नाही तर त्यांच्या नेतृत्वाला ही शहराने अमान्य केले असे होणार आहे. 

लक्ष्मण जगताप यांच्याप्रमाणेच अपक्ष आमदार आणि नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या महेश लांडगे यांचे अस्तित्व ही या निवडणुकीत पणाला लागणार आहे. विलास लांडे यांच्या विरोधात असलेल्या संतापाच्या जीवावर महेश लांडगे यांनी विधानसभेत यश मिळवले खरे पण हे यश अपघाताने नाही तर खरंच जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलो हे त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे. महेश लांडगे यांना सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी विधानसभेत मदत केली होती. आता त्या सर्वांना निवडणुकीत तिकीट मिळवून देण्यापासून त्यांच्या विजयाची हमी त्यांना द्यावी लागणार आहे. त्यांच्या पाठीराख्याना पराभव स्वीकारायला लागला तर त्यांच्यानेतृत्वाचे ते अपयश ठरणार आहे. 

विधानसभा निवडणुकीतला पराभव आणि विधानपरिषदेत अयशस्वी बंड केलेल्या विलास लांडे यांची ही कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. महेश लांडगे आमदार असले तरी भोसरी मध्ये माझेच नगरसेवक अधिक हे त्यांना दाखवावे लागणार आहे. मुळात आमदार नसल्याने त्यांचं राजकीय अस्तित्व लांडगे यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे लांडगेंचा झंझावात रोखण्यासाठी विलास लांडे यांना भोसरी मध्ये त्यांची ताकत अधिका अधिक नगरसेवकांच्या विजयाने सिद्ध करावी लागणार आहे. एकूणच काय तर पिंपरी चिंचवड मध्ये महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांचं अस्तित्व पणाला लागणार आहे. आता मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे .