ब्लॉग : पॅरिस हल्ला आणि भारत

Updated: Nov 19, 2015, 04:45 PM IST
ब्लॉग : पॅरिस हल्ला आणि भारत title=

फ्रान्स एक सहिष्णूत देश 

हेमंत महाजन/ फ्रान्स हा एक आधुनिक विचार सरणीचा, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणारा एक अतिशय सहिष्णूत देश मानला जातो. फ्रान्सची अती सहिष्णूताच या हल्ल्यांकरिता जबाबदार होती का? फ्रान्समध्ये धर्माला महत्त्व दिले जात नाही. तिथे ख्रिश्चनिटी हा सर्वांत मोठा धर्म असला तरीही तिथली चर्चेस सध्या ओसाड पडत चालली आहेत. 

फ्रान्सचे प्रत्युत्तर वाखाणण्याजोगे 

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ज्याप्रमाणे फ्रान्सने याला प्रत्युत्तर दिले ते वाखाणण्याजोगे आहे आणि यातील अनेक मुद्दे भारतासारख्या देशाला सुद्धा अंमलात आणता येणे शक्य आहे. दहशतवादी हल्ला झाल्याबरोबर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी देशात तात्काळ राष्ट्रीय आणिबाणी जाहीर केली. यामुळे पोलीस व सैन्याला कुठल्याही संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे अधिकार मिळाले. या शिवाय पोलीस आणि सैन्याला कुठल्याही भागामध्ये दहशतवाद्यांविरुध्द शोध मोहिम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर फ्रान्सचे सर्व नागरिक व सरकार यांनी आम्ही दहशतवादाविरूद्ध एकत्रपणे लढू असे जाहीर केले. भारतात मात्र अशा वेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षात आपापसात वाद होतात आणि अनेक वेळा काही टीव्ही चॅनल्स आपला टीआरपी वाढवण्याकरिता राजकीय पक्षात भांडणे लावणे सुरू करतात. 

जिथे स्फोट झाले होते, तो भाग रिकामी करून तिथे सुरक्षा व्यवस्था आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करण्याची पूर्ण मोकळीक दिली. आपल्या देशात मात्र याच्या नेमके उलटे होते. स्फोट झालेल्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होते, मीडिया तिथे मोठ्या प्रमाणात येते आणि त्यामुळे तपास यंत्रणा, संरक्षण यंत्रणांना यांना त्यांचे काम करण्यास फार मोठा अडथळा येतो. या शिवाय ब्रेकिंग न्यूजच्या हट्टापायी दहशतवाद्यांनाच जास्त महत्त्व दिले जाते. हा हल्ला झाल्यापासून मी पाच-सहा फ्रेंच वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन पाहिले, त्यात मला असे दिसून आले की, पोलीस खात्याचा फक्त जनसंपर्क अधिकारीच माहिती देत होता, बाकी सर्व पोलीस यंत्रणा आपापले काम करण्यात गुंतलेले होते. या उलट आपल्या देशात पोलीस व सुरक्षा यंत्रणांना अडथळा केला जातो आणि त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते. 

वृत्तवाहिन्यांचे संयमित वृत्तांकन

तिथल्या वृत्तवाहिन्यांनी दिलेले वृत्त हे अत्यंत संयम राखून दिलेले वृत्त होते. असे म्हटले जाते की, दहशतवादी जेव्हा दहा लोकांना मारतात तेव्हा त्यांचा प्रयत्न हा लाखो लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणे हा असतो. म्हणून दहशतवाद्यांना विनाकारण प्रसिद्धी देणे हे टाळले पाहिजे, जसे फ्रान्सच्या मीडियाने केले. त्यांचे सर्व लक्ष त्यांच्या सुरक्षा यंत्रणांच्या कामाला जास्त प्रमाणात प्रसिद्धी देणे होते. तेथील सर्व नागरिक, प्रशासन व सरकार हे सर्व एकत्रपणे या दहशतवादी हल्ल्याला सामोरे गेल्याची चित्र जगासमोर आले. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बिमोड ते फक्त तीन तासात करू शकले. हे त्यांचे यश आहे. 

फ्रान्सच्या चुका 

पण ज्या अर्थी असा दहशतवादी हल्ला फ्रान्सवर झाला. त्या अर्थी काही चुकाही त्यांच्याकडून झालेल्या आहेत. त्यांच्या काही मोठ्या चुका अशा आहेत. आज फ्रान्समध्ये दहशतवाद पसरतो आहे, सरकार अतिरेकी विचारसरणीविरुद्ध प्रचार करत आहे. पण हे प्रयत्न फार कमी पडत आहेत. अतिरेकी विचारसरणी पसरवली जाते सोशल मीडियाद्वारे किंवा इतर प्रसारमाध्यमांचा वापर करून. 

त्यामुळे अशा मीडियावर लक्ष ठेवून जिथे जिथे दहशतवादाला खतपाणी देणारे प्रयत्न दिसून येतील ते तिथल्या तिथे थांबवणे फार महत्त्वाचे आहे. ताज्या माहिती प्रमाणे भारताने सर्वांत जास्त प्रमाणात दहशतवादाला खतपाणी देणारे मजाकूर फेसबुकवरून डिलीट केले आहेत. 
त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवून जिथेजिथे असे प्रयत्न दिसतील ते ताबडतोब थांबवले पाहिजेत, त्याचबरोबर अशा प्रकारे प्रचार करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना अटक करण्याचे कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत. अतिरेकी विचारसरणी ही कशी थांबवायची यासाठी अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. पण त्यावर अंमलबजावणी करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. मुंबईमधील काही युवक हे आयसीसमध्ये सामिल होण्यासाठी गेले होते. ते सर्व उच्च शिक्षित व चांगल्या कॉलेजातून शिक्षण घेतलेले सुशिक्षित तरुण होते. तरीपण ते दहशतवादाकडे वळले होते. म्हणून अशा दहशतवादाला थांबवण्याची जबाबदारी त्या त्या युवकांची आहेच पण त्याशिवाय त्यांचे आई-वडील, त्यांचे नातेवाईक, त्यांची शाळा-कॉलेजस, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सामाजिक संस्था, मीडिया तसेच अजाबाजूला राहणारा शेजारी नागरिक तसेच इतर सर्व भारतीयांची आहे. दहशतवाद थांबवण्यासाठी आपल्या प्रत्येकालाच आपापल्या स्तरावर प्रयत्न करावे लागतील.
 
दुसरी फ्रान्सची चूक म्हणजे, गुप्तहेर माहितीसाठी ते पूर्णपणे टेक्निकल इंटेलिजन्सवर अवलंबून राहीले होते. फ्रान्समध्ये लाखो सीसीटीव्ही कॅमेरे, सॅटेलाईट सर्व्हेलन्स, ड्रोन सर्व्हेलन्स, यांचा वापर होत आहे. युरोपमधील सरकार त्यांच्या नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते, तरीही त्यांना असा दहशतवादी हल्ला होणार आहे, हे पकडता आले नाही. त्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात माहिती जमा होते पण त्या माहितीचा अर्थ लावणे त्यांना जमलेले नाही. आपल्याकडील उदाहरण द्यायचे झाले तर, आपल्याकडील काही मोठ्या मंदिरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, पण त्या सीसीटीव्हीच्या फुटेजचे अॅरनालिसिस करण्यासाठी तिथे कोणीही नाही. त्यामुळे फक्त माहिती गोळा करणे हे महत्त्वाचे नसते, तर त्या माहितीतून काय अर्थ निघतो आहे हे काढणे तितकेच महत्त्वाचे असते. 

याकरिता आपल्या देशाला इतर आधुनिक देशातून तंत्रज्ञान आयात करता येण्यासारखे आहे. जसे फेस रेकग्निझेशन सॉफ्टवेअर, सिग्नेचर रेकग्निझेशन सॉफ्टवेअर, व्हाईस रेकग्निझेशन सॉप्टवेअर अशा प्रकारची अनेक तंत्रज्ञाने विकसित करण्यात आलेली आहेत. भारताने ही सगळी तंत्रज्ञाने युरोपियन देश, अमेरिका, इस्त्राईल यांच्याकडून घेतली पाहिजेत आणि आपल्या टेक्निकल इंटेलिजन्सचा दर्जा वाढविला पाहिजे. 

ह्युमन इंटेलिजन्स सर्वात महत्वाचे

पण त्याहून जास्त महत्त्वाचे आहे, म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स, यासाठी आपल्या खबऱ्याचे जाळे पसरवून त्याद्वारे काढलेली माहिती. आज असे कुठलेही तंत्रज्ञान नाही की जे एखाद्या दहशतवाद्याच्या मनात प्रवेश करून त्याच्या मनात काय चालले आहे ते शोधू शकेल. जर आपल्याला दहशतवाद रोखायचा असेल तर या सर्व दहशतवादी गटांमध्ये आपले डमी दहशतवादी घुसवायला पाहिजेत, ज्यामुळे हल्ला होण्या आधीच आपल्याला तो थांबवता येईल. अर्थात हे करणे एवढे सोपे नाही, यासाठी फार उच्च कौशल्यांची गरज आहे. पण अशा प्रकारची कोव्हर्ट ऑपरेशन्स भारतीय सैन्याने अनेक वेळा केलेली आहेत. 

आपल्याला दहशतवादाच्या मुद्यावरून सगळ्या जगाला एकत्र आणून सगळ्या जगाची मदत घ्यावी लागेल. कारण दहशतवादी अनेकवेळा परदेशातून म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्थान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ अशा भागातून येत असल्यामुळे या देशांवरही आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. दहशतवादाविरुद्धची लढाई ही फार काळ चालणार आहे. त्यामुळे इतर देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून आपण धडे घेऊन आपली दहशतवाद विरोधी कारवाई उच्च दर्जाची करणे गरजेचे आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ले थांबवण्यास यश मिळेल. यासाठी आपल्याला आपल्या सर्व सीमा सुरक्षित कराव्या लागतील. जे दहशतवादी किंवा दहशतवाद्यांचे छुपे सेल भारताच्या आत लपले आहेत, अशांना गुप्तहेर खात्याच्या माहितीवरून शोधून काढावे लागेल. तसेच या दहशतवाद्यांची मुळे पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार अशा देशांमध्ये आहेत, ती तिथेच जाऊन कापावी लागतील. अशा प्रकारे बहुआयामी उपाय केले तरच आपण दहशतवादी हल्ला थांबवू शकतो. आशा करूया आपल्या सुरक्षा यंत्रणांनी पॅरिसमधील हल्ल्यावरून वेगवेगळे धडे घेतले असतील, ज्यामुळे आपला देश जास्त सुरक्षित होण्याकरिता मदत होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.