मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 6, 2017, 05:08 PM IST
 मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : "सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

गटबाजी..

शिवसेना-भाजपा युतीने सलग 20 वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता कायम ठेवली आहे. या 20 वर्षात काँग्रेसची मुंबई महापालिकेतील कामगिरी खालावतच गेली आहे. मुंबईतील काँग्रेसची कामगिरी सुधारत नाही यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षात असलेली गटबाजी. मागील अनेक दशके मुंबई काँग्रेसला गटबाजीने पोखरले आहे. आधीच मुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला सध्या अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे.

कारण हे आहे...

मुंबई काँग्रेसमधील गटबाजी नवी नाही. गटतटाचे राजकारण मागील अनेक दशके मुंबई काँग्रेसमध्ये सुरू आहे. मुंबई काँग्रेसला एकप्रकारे गटबाजीचा शाप आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. याच गटबाजीमुळे मुंबई काँग्रेसने आतापर्यंत अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच्या तोंडावर गटबाजीने आता पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. काँग्रेसमध्ये नेहमीच आपण दुसऱ्या नेत्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, आपली ताकद जास्त आहे हे पक्षश्रेष्ठींना दाखवण्याची स्पर्धा दिसून आली आहे. त्यामुळेच अध्यक्ष असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेसला यश मिळू नये यासाठी विरोधी गट नेहमीच सक्रीय असतो. हीच बाब मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला नेहमी खतपाणी घालत आली आहे. 

यापूर्वीचे दोन गट....

मुंबई काँग्रेसमध्ये सुरुवातीला गुरूदास कामत आणि मुरली देवरा यांचे दोन प्रमुख गट होते. या दोन गटात मुंबई काँग्रेस विभागली होती. पक्ष बाजूला ठेवून काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दोन गटात विभागले गेले होते. मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची ओळख काँग्रेसचे म्हणून नवे तर हाअमक्या गटाचा, तो तमक्या गटाचा अशीच आजपर्यंत कायम आहे. मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना गुरुदास कामत आणि त्यांच्या गटातील त्यांचे समर्थक मुरली देवरांच्या विरोधात सक्रीय होते. मुरली देवरा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेस वाढू नये यासाठी कामत गट तेव्हा सक्रीय असायचा. तिच परंपरा गुरुदास कामत अध्यक्ष झाल्यानंतर मुरली देवरा आणि त्यांच्या गटाने सुरू ठेवली. 

दिल्ली गंभीर नाही...

वारंवार या गटबाजीबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी झाल्या, एकमेकांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या, मात्र दिल्लीत बसलेल्या पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी कधीच गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. गटबाजी टोकाला गेल्यानंतर तात्पुरती आणि वरवरची मलमपट्टीच करून पक्षश्रेष्ठींनी तो विषय तसाच सोडून दिल्याचे आतापर्यंत पहायला मिळाले आहे. मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये काही प्रमाणात कृपाशंकर सिंह आणि प्रिया दत्त यांचेही गट अस्तित्वात आले, मात्र या गटांचा फारसा प्रभाव दिसला नाही. मुरली देवरा यांच्या निधनानंतर त्यांचा गटही फारसा सक्रीय राहिला नाही. दोन वर्षांपूर्वी मार्च 2015 ला मुंबंई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्ये “संजय निरुपम गट” हा आणखी एक गट अस्तित्वात आला. गुरुदास कामत यांच्याकडून मुंबई अध्यक्षपद गेल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले, केंद्रात मंत्रीपद, त्यानंतर गुजरात आणि राजस्थान या राज्याचे प्रभारी म्हणून पक्षाने कामत यांच्यावर जबाबदारी दिली. मात्र राष्ट्रीय राजकारणात असूनही कामत यांचे मुंबईवर लक्ष कायम होते. कामत मुंबईत नसले तरी त्यांचा गट मुंबईत सक्रीय आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कामत गट पुन्हा सक्रीय झाला असून स्वतः कामत यांनीही मुंबईतल्या राजकारणात आता उडी घेतली आहे.

निरूपमांना विरोध...

शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या आक्रमक संजय निरुपम यांची पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यापासूनच त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न विरोधी गटाने सुरू केला आहे. उत्तर भारतीय असणाऱ्या निरुपम यांच्या निवडीबरोबरच पक्षात त्यांच्याविरोधात सूर निघू लागला. मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत संघर्ष होऊ लागला, त्यातून निरुपम यांना टार्गेट केलं जाऊ लागलं. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द गुरुदास कामत यांनी या गटबाजीत आणि वादात उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मिडियावरून थेट संजय निरुपम आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांना यांना टार्गेट करून यंदाच्या निवडणुकीतील प्रक्रियेपासून आपण दूर राहणार असल्याचे सांगितले. 

निरूपम vs कामत

निरुपम गटाने कामत गटाच्या कार्यकर्त्यांना डावलल्याने कामत यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. निरुपम आणि मोहन प्रकाश हे दोघेही दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत. निरुपम शिवसेनेत असताना आणि “दोपहर का सामना”चे संपादक असताना त्यांनी सोनिया गांधीवर बरेच टीकात्मक लिखाण केले होते, तर मोहन प्रकाश समाजवादी पक्षात असताना त्यांनी आणीबाणीवरून इंदिरा गांधींवर टीका केली होती. ही कारणे पुढे करत मुंबई काँग्रेसमधील निरुपम विरोधी गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नसल्याचे सांगत आहेत. 

थोडी मलमपट्टी...

एकीकडे पक्षश्रेष्ठींचा निर्णय शिरसंवाद्य अशी भाषा करणारे काँग्रेसचे हेच कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींनी नियुक्त केलेल्या अध्यक्षांच्या हाताखाली प्रामाणिकपणे पक्षाचे काम करायला तयार नाहीत. निश्चितच मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा संघर्ष समोर आल्याने काँग्रेस श्रेष्ठींना त्याची दखल घेणे भाग पडले आणि ही गटबाजी मिटवण्यासाठी किंबहुना त्यावर मलमपट्टी करण्यासाठी प्रभारींना मुंबईत पाठवण्यात आलं. मुंबई काँग्रेसचा इतिहास पाहता हा वाद आणि ही गटबाजी पूर्ण मिटणे अशक्य आहे. 

मत अनेक काँग्रेस एक

मुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसपुढे सध्या पक्षांतर्गत गटबाजी मिटवण्याचा पेच उभा राहिला आहे. इतर पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत गुंतले असताना काँग्रेसची शक्ती पक्षातील गटबाजी आणि वाद मिटवण्यात खर्च होत आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी पक्षाने पाठवलेले निरीक्षक भूपेंद्रसिंह हुडा यांनी काँग्रेसच्या वादाबाबत प्रतिक्रिया देताना “मत अनेक काँग्रेस एक” असे विधान केले आहे. मात्र त्यांचे हे विधान निश्चितच अपरिहार्यतेतून आले असावे. हुडा यांनी हे विधान केल्यानंतर उमेदवार निवडीवरून त्यांच्यासमोरच काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. 

अंतर्गत निवडणूक...

मुंबई काँग्रेसमधील टोकाच्या गटबाजीची परंपरा पाहता या निवडणुकीतही ती गटबाजी कायम राहली आहे. त्यातच कामत यांनी स्वतः या निवडणुकीपासून दूर राहण्याचे ठरवले आहे, मात्र दूर राहूनही ते संजय निरुपम यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस म्हणून नव्हे तर गट म्हणूनच काँग्रेसचे कार्यकर्ते या निवडणुकीतही काम करताना दिसतील. मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यापेक्षा आपल्या विरोधी गटाचा पराभव कसा होईल याच भावनेतून काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली जाईल अशी चिन्हं यावेळीही आहेत.