मर्लिन मन्रो...मृत्यूनंतरही जीवंत असलेली एक दंतकथा...

हॉलिवूडचं ग्लॅमर म्हणजे मर्लिन मन्रो... सौंदर्याचा मापदंड म्हणजे मर्लिन मन्रो... अभिनयाचा मानदंड म्हणजे मर्लिन मन्रो लिव्हिंग लिजंड म्हणजे मर्लिन मन्रो..

Updated: Nov 15, 2014, 10:16 AM IST

हॉलिवूडचं ग्लॅमर म्हणजे मर्लिन मन्रो...

सौंदर्याचा मापदंड म्हणजे मर्लिन मन्रो...
अभिनयाचा मानदंड म्हणजे मर्लिन मन्रो
लिव्हिंग लिजंड म्हणजे मर्लिन मन्रो..
फॅशन आणि स्टाईलचा आयकॉन म्हणजे मर्लिन मन्रो...
महत्वाकांक्षा, हेकेखोरपणा, लहरीपणा, एकाकीपणा, शोषण म्हणजे मर्लिन मन्रो
पुन्हा पुन्हा उध्वस्त होणं आणि पुन्हा पुन्हा सावरणं म्हणजे मर्लिन मन्रो...
शापित अप्सरा म्हणजे मर्लिन मन्रो...
एक न उलगडलेलं कोडं म्हणे मर्लिन मन्रो .... 


मर्लिन मन्रोचा फेम ड्रेस ब्लोइंग फोटो

मर्लिन जन्मली 1 जून 1926 ता लॉसएंजेलिस काऊंटी हॉस्पिटल मधील चॅरिटी वार्डमध्ये. मर्लिननं आपल्या आलिशान घरात 5 ऑगस्ट 1962 ला ड्रगचा ओव्हरडोस घेत मृत्यूला मिठी मारली. 
मर्लिनला जाऊन पन्नास वर्ष होऊन गेली....पण तिच्या चाहत्यांच्या मनामनात ती जीवंतच आहे...

अवघ्या 36 वर्षाचं आयुष्य.... पण त्यात काय नव्हतं ? 
उन्माद होता, झींग होती, कारुण्य होतं... झपाटलेपण होतं तसचं स्वत:ला आणि दुस-यांना उध्वस्त करणही होतं..... 
सगळं काही कल्पनेपलिकडचं... सगळं काही लार्जर दॅन लाईफ...  
तिच्या मादक सौदर्याला होती एक कारुण्याची झालर...

मर्लिनचं बालपण म्हणजे होती एक दु:खाची कहाणी...आईच्या वेडेपणामुळं बालपणी  ती अनाथालयांमध्येच राहिली...तिचे वडिल कोण होते हे तिला शेवटपर्यंत कळलंच नाही...बालपणीचं तिच्या वाटयाला आलं शोषण आणि उपेक्षा.....नातेवाईकांनीही जबाबदारी झटकण्यासाठी सोळाव्या वर्षीचं तिच्या लग्नाचा घाट घातला.  नवरा मर्चंट नेव्हीत. त्यामुळं तो बराच काळ समुद्रावरच असे... तीनंही एका विमान कंपनीच्या प्लॅन्टमध्ये नोकरी धरली... 
पुढे ग्लॅमरस म्हणून गाजलेल्या मर्लिनच्या तेव्हापर्यंतच्या आयुष्यात चमकदार असं काहीच नव्हतं... 

कलाटणी मिळाली ती 1945 साली... एका फोटोग्राफरनं तीचे  फोटे काढले आणि ती काही मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली..
 20th Century Fox  या कंपनीनं कॅमे-याच्या प्रेमात पडण्याची तिची क्षमता ओळखली आणि मग जन्म झाला एका दंतकथेचा.... 
पुढे तिचं लग्न मोडलं आणि मग अभिनय हाच मर्लिनचा श्वास बनला... तिचा घटस्फोट झाला त्याच वर्षी म्हणजे 1946 ला तीनं पहिला चित्रपट साईन केला.. तिचं मुळ नावं होतं नार्मा जीन मन्रो.... ते टाकून तीनं मर्लिन मन्रो हे ग्लॅमरस नाव धारणं केलं ते याच काळात...

पुढच्या दशकभरात मन्रोनं कॉमेडी आणि नाट्यमय चित्रपटांमधून रसिकाचं मनोरंजन केलं... हाऊ टू मॅरी ए मिलिओनियर, सम लाईक इट ह़ॉट, डोन्ट बॉदर टू नॉक आणि नायगारा हे तिचे चित्रपट याच काळातले... तिच्या अभिनयाचंही कौतुक होऊ लागलं होतं... सम लाईक इट हॉट  या चित्रपटासाठी तिला गोल्डन ग्लोब अर्वाड मिळालं...

सुंदरपण मुर्ख तरुणीच्या  भूमिका करुन मर्लिन कंटाळली होती... मग तीनं न्यूयार्कमध्ये जाऊन ली स्ट्रासबर्गच्या Actors  Studio मध्ये जाऊन अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं... त्याचा  परिणामही लगेच दिसला.... त्यानंतर आलेल्या बस स्टॉप मधल्या तिच्या अभिनयाची न्यूयॉर्क टाईम्सनं स्तुती केली...

मग तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट येतच होते.... ती इंटरनॅशनल स्टार बनली होती.... हावर्ड हॉक्स, जॉन ह्यूस्टन, लॉरेन्स ऑलिव्हिए, बिली वाईल्डर अशा प्रतिभावंतांच्या साथीनं तीनं हॉलिवूडचा रुपेरी पडदा गाजवून सोडला.... तिच्या एकूण चित्रपटांची संख्या होती 33....


मर्लिन मन्रो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी

अशा सौंदर्यवतीच्या आयुष्यात अनेक पुरुष आले नसते तरच नवल... आर्थर मिलर या प्रतिभावंत लेखकासोबत तीनं लग्नाचा पुन्हा डाव मांडला... . पण तो फारसा रंगला नाही.... बेसबॉलपटू ज्यो, सर लॉरेन्स ऑलिव्हिए, फ्रँक सिनात्रा ते अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी.... मर्लिनच्या रुपानं सगळ्यांनाच भूरळ घातली होती.... तीचं सौंदर्य होतचं तसं.....

1961 ला आलेला द मिसफिटस् हा तिचा शेवटचा पूर्ण झालेला चित्रपट ठरला... 1962 मध्ये समथिंग्स गॉट टू गिव्हमधून तिची हकालपट्टी झाली.... अनेक दिवस चित्रपटाच्या शूटिंगला तीनं दांडी मारली होती......तिचा हिरो होता डिन मार्टिन.... मार्टिननं तिच्याशिवाय चित्रपट पूर्ण करण्यास नकार दिला आणि मग तो  चित्रपटही बाळगळला..... शेवटचे दोन चित्रपट लेट्स् मेक लव्ह आणि द मिसफिट्स् बॉक्स ऑफिसवर आदळले...... एकीकडे वैयक्तिक जीवनात न जुळलेले सूर आणि दुसरीकडे बॉक्स ऑफिसवरचं अपयश..... मर्लिननं हे दु:ख कसं पचवलं असेल ?

मर्लिन एखाद्या धूमकेतूसारखी हॉलिवूडच्या क्षितिजावर उगवली आणि तीनं सगळ्यांना झपाटून टाकलं.... पण या वादळाचा शेवटही तसाच झाला....

1962 मध्ये मर्लिन मन्रोनं ब्रेंटवूडमध्ये एक आलिशान घर घेतलं . मेक्सिको ट्रिप दरम्यानं तीनं हे घर सजवण्यासाठी खास खरेदीही केली होती.... पण याच घरात मर्लिनंचा शेवट व्हावा असं विधिलिखित होतं...
कारण आयुष्यातील उलथापालथीमुळं तीनं व्यसनांना जवळ केलं होतं....


 

5 ऑगस्ट 1962....मर्लिन मन्रो तीच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली... सोबतीला होती झोपेच्या गोळ्यांची  बाटली.... ड्रग ओव्हरडोसनं तीचा मृत्यू झाला होता...
का संपवलं मर्लिननं आत्महत्या केली की तीचा खून झाला होता? 

मर्लिन जिवंत होती तेव्हा तर तीनं सगळ्यांनाच झपाटून टाकलं होतचं....पण तीच्या मृत्यूनंतरही तीनं अनेकांना प्रेरणा दिली... 
मॅडोना, एल्टन जॉन, लेडी गागा.... असे कितीतरी.... या सगळ्यांना प्रेरणा आहे ती मर्लिनची.....
मर्लिन मन्रो म्हणजे मृत्यूनंतरही न उलगडलेलं एक कोडं...
मर्लिन मन्रो म्हणजे एक मृत्यूच्या क्षितिजावरुनही खुणावणारं एक मृगजळ,,,,,

मर्लिन मन्रो म्हणजे मृत्यूनंतरही जीवंत असलेली एक दंतकथा......

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.