अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग 1)

अमेठी... हे नाव आलं की, संजय गांधी... राजीव गांधी... राहुल गांधी यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. पंरतु गांधी घराण्यापेक्षाही अमेठी राजघराण्याचा इतिहास रंजक आहे.

Updated: Mar 8, 2017, 05:13 PM IST
अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग 1) title=

रामराजे शिदे

सिनिअर करस्पाँडन्ट, झी मीडिया

अमेठी... हे नाव आलं की, संजय गांधी... राजीव गांधी... राहुल गांधी यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. पंरतु गांधी घराण्यापेक्षाही अमेठी राजघराण्याचा इतिहास रंजक आहे. आता अमेठीचं राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. अमेठीचे राजा संजय सिंग यांची पहिली पत्नी (माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची भाची) राणी गरिमा सिंग आणि दुसरी पत्नी राणी अमिता सिंग - कुलकर्णी या दोघी एकमेकांविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. गरिमा सिंग भाजपतर्फे आणि अमिता सिंग काँग्रेसतर्फे मैदानात उतरल्या आहेत. अमेठीच्या सत्तेच्या चाव्या ज्याच्या हाती असतील त्याच्याच हाती अमेठी राजघराण्याच्या चाव्या राहणार आहेत.

उत्तर प्रदेशच्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अमेठीत केवळ कोण जिंकणार? हे ठरणार नसून 'भूपती भवना'त कोण राहणार आणि कोण बाहेर जाणार? राजघराण्याचा वारस कोण होणार? हेसुद्धा ठरणार आहे.

'राजा'च्या चालीने काँग्रेस-सपा युती तुटली

काँग्रेस आणि समाजवादी पार्टीची उत्तर प्रदेशात युती आहे. परंतु अमेठी मतदारसंघ अपवाद ठरला. इथं अमेठीचे राजा संजय सिंग यांनी काँग्रेस आणि सपामध्ये युती होऊ दिली नाही. २०१२ च्या विधानसभा निवडणूकीत गायत्री प्रजापती यांनीच अमिता सिंग यांचा पराभव केला. अमिता सिंग यांचा पराभव म्हणजे राजा संजय सिंग यांचा पराभव... हा पराभव संजय सिंग यांच्या जिव्हारी लागला. अमेठीवर एकछत्री राज्य गाजवणा-या राजा संजय सिंग यांना गायत्री प्रजापतीच्या रूपानं आव्हान मिळालं. प्रजापती याचा पराभव करून अमेठीतून घालवण्यासाठीच संजय सिंग यांनी अमेठीत सपा-काँग्रेस युती होऊ दिली नाही. संजय सिंग आणि गायत्री प्रजापती दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

विद्यमान मंत्री गायत्री प्रजापती अमेठीतील ताकदवान नेते असल्यामुळे त्यांना तिकीट नाकारता येणार नसल्याचं समाजवादी पार्टीनं स्पष्ट केलं. तर, अमेठी मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे पाळेमुळे उखडून काढण्याचा चंग राजा संजय सिंग यांनी बांधला. राजा संजय सिंग यांचं अखिलेश यादव यांच्याशी नातं चागलं आहे. परंतु समाजवादी पार्टी अमेठीत नको, हे राजाचं तत्व... काँग्रेसला आपली ताकद दाखवून देण्यासही राजा संजय सिंग विसरले नाही.

काँग्रेस राजाच्या दरबारात का नमती झाली?

राहुल गांधी यांच्या राजकीय भवितव्यासाठी आणि अमेठीवर एकछत्री सत्ता गाजवायची असेल तर राजा संजय सिंग नाराज करून चालणार नाही, हे काँग्रेस श्रेष्ठींना माहित होतं. 

यापुर्वीही भाजपनं स्मृती इराणी यांना अमेठीत उतरवून काँग्रेसचा गड पाडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संजय सिंग यांच्या भक्कम व्यूहरचनेमुळे भाजपाला आजतागायत ते शक्य झालं नाही. अमेठीला काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यासाठी राजा संजय सिंग यांना दुखावता येणार नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी अमेठीत युती होऊ शकली नाही. भाजपनं अमेठीत हातपाय मारण्याचा प्रयत्न केला परंतू यश मिळालं नाही. आता भाजपच्या गळाला मोठा मासा लागला आहे. संजय सिंग यांच्याच पत्नीला अधिकार, सूड आणि सत्तेचं महत्त्व समजून सांगण्यात भाजप यशस्वी झाली. त्यामुळे गरिमा सिंग आपल्या पतीविरोधात आणि त्यांचा मुलगा अनंत विक्रम सिंग आपल्या बापाविरोधात दंड थोपटून निवडणूकीच्या रिंगणात उभा राहिला आहे.


अमिता सिंग कुलकर्णी यांच्यासोबत

घटस्फोट, राजकीय महत्त्वकांक्षा की संपत्तीची लालसा

संजय सिंग यांची पहिली पत्नी गरिमा सिंग यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा अनंत विक्रम सिंग, मुलगी सभ्या आणि महिमा. अनंत विक्रम सिंग यांची राजकीय महत्त्वकांक्षा असली तरी पिता संजय सिंग यांच्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पिता पुत्रातील वाद भाजपने हेरला. भारतीय जनता पार्टीने अनंत विक्रम सिंग यांना पुढे करून पिता-पुत्रात मोठी दरी निर्माण केली. अनंत विक्रम सिंग यांनी भूपती भवनात मुक्काम ठोकला परंतू पोलिसांना पाचारण करून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

गरिमा सिंग आपल्या मुला मुलींसह भूपती हवेलीतील चार खोलीत राहत होत्या. गरिमा सिंग यांना राजा संजय सिंग यांनी १९९५ मध्येच घटस्फोट दिला. मात्र, संपत्तीच्या लोभापायी गरिमा सिंग आंधळी झाल्याचा आरोप संजय सिंग आणि अमिता सिंग यांनी केला. तर पहिली पत्नी गरिमा सिंग आपला अधिकार सोडण्यास गरिमा तयार नाहीत. गरिमा सिंग यांना १९ वर्षे भूपती भवनात प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे सवत ला धडा शिकवण्यासाठी गरिमा सिंग राजकारणात आल्या. अमीता सिंग यांनी निवडणूक आयोगाकडे ३६ कोटी संपत्ती असल्याची माहिती दिली आहे.

'भूपती भवना'ला तडा

अमेठीचे भूपती भवन... कधीकाळी याच भवनातून लोकांच्या समस्या सोडवल्या जात असे. मात्र, आज तो वादाचा गड झाला आहे. लोकांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या भूपती भवनाला आता पोलिसांचा वेढा आहे. नळावरील भांडणाप्रमाणे भूपती भवनात संजय सिंग आणि अनंतविक्रम सिंग यांच्यात सतत वाद सुरू आहे. अमेठीच्या भूपती भवनाचं महत्त्व कित्येक वर्षापासून अबाधित होतं. परंतू आता भूपती भवनातील नातेसंबंधांना तडे गेले आहेत. संजय सिंग यांनी ताकद लावली असूनही गरिमा सिंग विजयी झाल्या तर भूपती भवनातील संजय सिंग यांच्या गादीला धक्का बसेल.

सय्यद मोदीच्या हत्येचं गूढ

अमीता सिंग-कुलकर्णी यांचा पहिला पती सय्यद मोदी याची हत्या अद्याप अमेठीतील जनता विसरली नाही. या हत्येसाठी अमिता सिंग याच जबाबदार असून राजा संजय सिंग यांचं घर फोडण्याचं कारणही अमिता सिंग असल्याची अमेठीच्या चौका चौकात चर्चा केली जाते. सय्यद मोदीच्या हत्येचं गूढ उकललं नसलं तरी, दोषी कोण आहे, हे लोकांना माहित आहे. त्यामुळे राणी गरिमा सिंग यांच्याबद्दल अमेठीतील जनमानसात आदर आणि सहानुभूती आहे. गरिमा सिंग यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांच्या मनात आहे.

अमेठीच्या निवडणूकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्य लढत दोन महिलांमध्येच आहे. तिसरे उमेदवार समाजवादी पार्टीचे मंत्री गायत्री प्रजापती. गायत्री प्रजापती यांच्यावरील गंभीर आरोपामुळे अखिलेश यादव यांनीही त्यांच्यापासून अंतर ठेवले आहे. गायत्री प्रजापतींनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असून या आरोपानं आता वणव्याचं रूप धारण केलं आहे.

नेहरू - गांधींची राजकीय कर्मभूमी

नेहरू आणि गांधी कुटुंबांनी अमेठीच्या राजघराण्याशी नेहमीच जुळवून घेतलं आहे. त्यामुळेच या दोन्ही कुटुंबांचा अमेठी राजघराण्याशी खूप जवळचा संबंध राहीला. नेहरूंनी तर आपलं राजकीय केंद्र अमेठी केलं होतं. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच १९२६ मध्ये जवाहरलाल नेहरू अमेठीतूनच सगळी रणनीती ठरत असे. एवढंच नव्हे तर राजा माधव बख्श सिंग यांनीच मोतीलाल नेहरू यांना आनंद भवन बनवण्याचा सल्ला दिला. नेहरूनंतर राजकीय पोकळी निर्माण झाली.. ही पोकळी भरून काढण्याचं काम संजय गांधी यांनी केलं. संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यावेळी राजीव गांधी यांनी अमेठीला स्विकारलं. आत्ता राहुल गांधीच्या रूपानं गांधी घराण्याची चौथी पिढी अमेठीला लाभली आहे. राहूल गांधी यांनीही अमेठीला राजकीय कर्मभूमी मानली आहे. नेहरूंनी अमेठीला नेहमीच झुकतं माप दिलं. त्याचं उदाहरण म्हणजे जेंव्हा राजघराण्याच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती, तेंव्हा रणंजय सिंग यांना मंत्री बनवण्याचा प्रस्ताव नेहरूंनी ठेवला होता. परंतू तो स्विकारण्यात आला नाही.

अमेठी राजघराणे आणि गांधी घराण्यात मतभेद झाले नाहीत, असं नाही. यापूर्वी १९८९ मध्ये दोन्ही कुटुंबात टोकाचे मतभेद झाले. त्यानंतर १९९९ मध्ये राजा संजय सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविली. परंतू , संजय गांधी यांचं मन वळवण्यात सोनिया गांधी यांना यश मिळालं. २००४ मध्ये पुन्हा संजय सिंग यांनी घरवापसी करत काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. गांधी आणि सिंग कुटुंबातील वाद मिटले परंतू आता संजय सिंग यांच्याच घरात सवतींमध्येच संपत्ती आणि अधिकारावरून वाद सुरू असून चार भिंतीतील हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे.