अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग दुसरा)

Updated: Mar 9, 2017, 05:21 PM IST
अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग दुसरा) title=

रामराजे शिंदे

सिनिअर करस्पाँडन्ट, झी मीडिया

अमेठीचं नाव मोठं... अमेठीत प्रवेश करताना भव्यदिव्य काहीच दिसलं नाही. विकास कशाशी खातात हेसुद्धा इथल्या लोकांना माहित नाही... वर्षानुवर्षे राज्य करणा-या अमेठीच्या राजाने नेमकं काय काम केलं ? नेहरू गांधी घराण्याच्या लाडक्या अमेठीत प्रजेच्या काय समस्या आहेत, असे अनेक प्रश्न डोक्यात गुंगत होते... त्यांची उत्तर शोधण्यासाठी निघालो...

रायबरेलीहून अमेठीच्या दिशेनं जात असतानाच गांधीनगर नावाचं छोटंसं गाव लागलं. हायवेला लागूनच गाव असल्यामुळे तिथं चहा घेण्यासाठी उतरलो. समोर एका दुकानात फर्निचरचं दुरूस्तीचं काम सुरू होतं. सहज दुकानाच्या पाटीवर नजर पडली. दुकानाच्या नावाच्या खाली पत्ता होता.. छत्रपती शाहू महाराज नगर. मला आश्चर्य वाटलं. तिथे दुकानदाराला विचारलं की, हे नाव कसं पडलं. त्यावर तो म्हणाला, सर ज्यादा कुछ पता नही पर यहां के लोग कहते है की, बहुत बडे राजा थे. इन्होंने लोगों के भलाई के लिए काम किया. अमेठीत प्रवेश केल्याबरोबर अमेठीच्या राजाची नाही तर माझ्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाची महती ऐकायला मिळाली...

गांधीनगरपासून काही अंतरानं हायवेच्या बाजूला लाल हवेली दिसली. हवेली मोडकळीस अाल्यामुळे कोणी राहत नव्हतं. तिथून एक छोटासा रस्ता जात होता. कोप-यावर दुकानात बसलेल्या पोराला विचारलं, रस्ता कहाँ जाता है. तो म्हणालो, आपको कहाँ जाना है. मी म्हणालो, ऐ रस्ता जहां जाता है, वहीं मुझे जाना है. त्यानं सांगितलं, कुछ दूरी पे फतेही गांव है. लगेच ड्रायव्हरला म्हणालो, चलो उस गांव में जाते है. ड्रायव्हर म्हणाला, सर अमेठी शहर में जाने के लिए देर हो जाएगी. मी म्हणालो, शहर का रास्ता गांव से जाता है. क्यों की गांव के ही लोग शहरमें जाकर बसते है. चलो.
ड्रायव्हरने गाडी गावाकडे वळवली. गावात गेल्यावर जाणवलं लोकसंख्या कमी आहे. तिथे एका घरासमोर थांबलो. बाहेर खाटावर एक तरूण बसला होता. त्याला विचारलं पाणी मिलेगा. तो म्हणाला जी भाईसाब. त्यानं घऱात जाऊन पाणी आणलं...

कुणी घर देता का घर ...

पाणी पिल्यावर त्यांनं विचारलं कहां से आए हो. मी म्हणालो, दिल्ली से. झी न्यूज का नाम सुना है... उसी चॅनेलसे है. त्यावर तो म्हणाला, इलेक्शन के लिए ? मी म्हणालो हां.. 

त्यावर तो म्हणाला, सर यहां क्या रखा है. ना नौकरी है, ना ही कुछ काम. हमारा पूरा घर तो लखनौ और दिल्ली जाकर बसा है. मी म्हणालो, "लेकीन अमेठी का नाम तो बडा है. यहां कुछ नहीं किया राहुल गांधींने." शेती आहे पण लाईट नसते. म्हणून नाइलाजास्तव घर सोडून जावं लागतं. 

चॅनेलवाले आल्याची खबर गावात पोहोचली होती. आसपासच्या काही महिला तिथं आल्या. त्यांना मी विचारलं, समाजवादी पार्टी की सरकार अच्छी है या मोदीजी की... त्यापैकी एक महिला म्हणाली, "मोदीजी तो भाषण में स्वच्छ भारत नारा देते है, यहां हमारे गांव में एक भी टायलेट नही. बहु बेटीयों को खुले में जाना पडता है." मी म्हणालो, आपने सरकार को बताया क्या की इस गांव में किसी के भी घर में शौचालय नहीं है. त्यावर त्या म्हणाल्या, इथं ७-८ महिन्यापूर्वी काही अधिकारी आले होते. त्यांना शौचालयचा अर्ज भरून दिला. परंतू आजतागायत पुन्हा कोणी फिरकलं नाही. इतका वेळ त्या महिलेच्या मागे लपत उभी असलेली महिला पुढे आली, तीनंही आपलं गा-हाणं मांडलं. ती सध्या झोपडीत राहते. दोन वर्षापासून ती सरकारकडे घर मिळवण्यासाठी पाठपुरावा करते परंतू तिला अजून घर मिळालं नाही. तिच्याकडूनही अधिका-यांनी अर्ज लिहून घेतला. परंतू घर आणि त्या अधिका-याचा कोणताच थांगपत्ता लागला नाही. या गावात जिकडे पाहावं तिकडे गुरांचा गोठा दिसत होता. त्यातच या गावक-यांनी संसार थाटला होता. सर्व गावक-यांनी त्यावेळी मला सांगितलं की, शौचालय आणि घर मिळालं नसल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहोत. आता ना मोदी , ना राहुल.. ना अखिलेश .. यापैकी कोणावरही या लोकांचा विश्वास उरला नाही. 

फतेहीची मोहीम फत्ते केल्यानंतर अमेठीच्या दिशेने निघालो. अमेठी शहराच्या मुख्य चौकात पोहोचलो. तिथं पांढरा पूर्णाकृती पुतळा दिसला. थांबून पाहिलं तर तो राजीव गांधी यांचा पुतळा होता. आसपासच्या व्यापा-यांना मी म्हणालो, "अमेठी मतलब आप व्हिआयपी लोग हो..." त्यावर सोन्या चांदीचा व्यापार करणारा तरूण म्हणाला "सर हम व्हिआयपी कहाॅ के... वो राजीव गांधी के पुतले के उपर कौवे बैठते है और नीचे कुत्ते बैठते है... इतनी गंदगी है लेकीन देखनेवाला कोई नही. ये है व्हिआयपी लोगों का हाल."  

मी म्हणालो... यहां तो एक भी जुर्म नही होता होगा ... तेवढ्यात दुसरा तरूण म्हणाला, अमेठीच्या भर बाजारात दोघांची हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस गुन्हे वाढत आहेत. व्यापा-यांकडून हप्ते घेतले जातात. वर्षानुवर्षे हे सगळं पोलिसांच्या नाकाखाली सुरू आहे.

अमेठीतील स्टुडंड फेडरेशनचा प्रभास शुक्ला म्हणतो, अमेठीत राजा संजय सिंग यांचं काॅलेज आहे परंतू शिक्षण चांगल्या दर्जाचं नाही. इथल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवण्याचा अधिकारसुद्धा नाही. लगेच आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर केला जातो. राजा संजय सिंग यांनी दुस-या पत्नीचा प्रचार जोरात केला असला तरी, मी विद्यार्थी म्हणून भाजपच्या गरिमा सिंग यांच्याच पारड्यात मत टाकणार... असं ठासून सांगताना प्रभासच्या डोळ्यातला काँग्रेसविरोधचा संताप दिसला. हा संताप व्यापारी वर्गातही आहे. कारण, समाजवादी पार्टीच्या गुंडाच्या दादागिरीला व्यापारी वैतागले आहेत.

मराठमोळी अमीता सिंग

अमिता सिंग या मूळ मराठी आहेत. त्यांचं मुंबईतील शिवाजी पार्क येथे घर असल्यामुळे महाराष्ट्राशी नातं अजूनही आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी अमेठीतील काँग्रेस कार्यालयात गेलो. दुपारच्या सुमारास अमिता सिंग कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी बैठक सुरू होती. मी व्हिजिटींग कार्ड पाठवलं. कार्ड पाहिल्याबरोबर बैठक मध्येच थांबविली आणि मला बोलवलं. आत गेल्याबरोबर अमिता सिंग यांनी मराठीत मला विचारणा केली, रामराजे तुम्ही मराठी आहात का... मी म्हटलं हो. अरे, माझ्या माहेरचे आहात तुम्ही, असं म्हणून त्यांनी मला बसायला सांगितलं. महाराष्ट्रातील मराठी व्यक्तीला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत होता. शिवार्जी पार्कात आणि अंधेरीला घर असल्याचं त्यांनी सांगितलं. अमिता यांची मुलगी दिल्लीतील हायकोर्टात सुब्रमण्यम स्वामी यांच्याकड़े प्रॅक्टीस करते. मी विचारलं, सुब्रमण्यम स्वामी ? त्या म्हणाल्या, राजकारण आणि वैयक्तीक संबंध हे वेगळे असतात. त्यांनी मोबाईलमधूनच लगेच मुलीचा फोटो काढून दाखवला... आणि म्हणाल्या, 'बघा.. दिसते की नाही अगदी बापासारखी...'

२० मिनिटं आम्ही गप्पा मारल्या. मुलाखत घेणं बाकी होतं. प्रचाराला उशीर होत असल्यामुळे त्यांच्या अवती भवती त्यांचे पीए चुळबुळ करत होते. तरीही त्यांनी ४० मिनिट वेळ दिला. मुलाखत झाल्यानंतर मला म्हणाल्या, २५ वर्ष झाली मी अमेठीत आहे. त्यामुळे मराठी बोलताना काही शब्द सुचत नाहीत. परंतू अमिता सिंग यांनी कुठेही न अडखळता मराठीत मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी समाजवादी पार्टी आणि भाजप सरकारवर आरोप केले. कोणताही उद्योग आणला तर समाजवादी सरकार पूर्ण होऊ देत नाही आणि केंद्राच्या योजना भाजप सरकार देत नाही. अमेठी हा मतदारसंघ गांधी घराण्याशी संबंधित असल्यामुळे अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजा असूनही प्रजेला दारिद्र्याचा शाप का?

सरकारनं उद्योगासाठी काही विशेष कष्ट घेतल्याचं दिसून येत नाही. अमेठीत तीन महत्त्वाच्या कंपन्या आल्या. मालविका स्टील, उषा स्टील प्लांट आणि सम्राट सायकल. परंतू यापैकी मालविका स्टील, उषा स्टील प्लांट बंद पडले आहेत. तर सम्राट सायकल बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तरूणांना रोजगार नाही. काॅलेज आहेत परंतू नोक-या नाहीत. अमेठीच्या मुख्य चौकापासून ते बाजारात फेरफटका मारल्यावर काही हार्डवेअर आणि किराना दुकानं दिसतात. परंतू नावाजलेल्या कंपनीचं शो रूम सुद्धा पाहायला मिळत नाही. आसपासच्या गावातील मुलं शिक्षणासाठी अमेठीत येतात. ये जा करण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. अमेठी रेल्वे स्टेशनवर विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. परंतू रेल्वे परिसर आणि शहराची अवस्था पाहिल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मोदींच्या स्वच्छता अभियानाचा विसर पडलेला दिसतो. अमेठीला लाभलेल्या नेत्यांची यादीतील नावे खूप मोठी आहेत. राजा.. महाराजा.. राणी.. नेहरू.. संजय गांधी.. पंतप्रधान राजीव गांधी आणि आत्ता राहुल गांधी... तरीसुद्धा या नेत्यांनी अमेठीला दारिद्रय आणि गरिबीचा शाप असल्यासारखं ठेवलं... केवळ एकमेकांच्या फायद्यांसाठी अमेठीचे राजा आणि राजकीय नेत्यांनी सौदा केला. त्यात प्रजेचं हित जपलं गेलं नाही.

'मेरा घर भाजपा का घर..'

'मेरा घर भाजपा का घर..' या घोषणांचं पोस्टर लावून भाजपनं प्रचार सुरू केला आहे. त्यातून अमिता सिंग या बाहेरच्या असून गरिमा सिंग याच ख-या राजघराण्याच्या उत्तराधिकारी आहेत, असा ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. अमेठीवर त्यांचा अधिकार आहे, हे घर त्यांचंच आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूकीत विजयी करा, असा संदेश पोहोचवला जात आहे. अमेठीतील जनता सत्तेची चावी कोणाच्या हाती देईल, हे निकालातून कळेल. परंतू अमेठीत भाजपच्या बाजूने सहानुभूती असून आणि अमेठीवासिय मोदींच्या परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होत असल्याचे चित्र आहे. इथं पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व जास्त आहे. गरिमा सिंग यांचा फायदा भाजपला मिळणार आहे आणि भाजपच्या साथीनं गरिमा सिंग आपला सूड उगवणार आहेत. यात दोघांचाही फायदा आहे. त्यात मोदींचा ज्वर अमेठीतील तरूणांच्या अंगात चढला आहे. त्यामुळे निवडणूकीत अमेठीत कमळ फुलवण्याची भाजपला संधी आहे. संजय सिंग यांची पहिली पत्नी गरिमा सिंग आणि दुसरी पत्नी अमीता सिंग कुलकर्णी यांपैकी अमेठीत कोणीही निवडून आलं तरी, अमेठीवर सिंग राजघराणेच राज्य करणार, हे मात्र नक्की...