ब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही!

Updated: Apr 19, 2017, 04:42 PM IST
ब्लॉग : ‘धमक’ तर हवीच... जगायलाही! title=

शुभांगी पालवे
प्रतिनिधी, झी 24 तास
(shubha.palve@gmail.com)

गेल्या शुक्रवारी लातूरच्या शितल वायाळ या २१ वर्षीय मुलीच्या आत्महत्येची बातमी समोर आली. या बातमीचे वेगवेगळे कंगोरे होते... वरवर पाहता शितलनं आत्महत्येचा निर्णय हा तिच्या वडिलांना कर्ज न मिळाल्यामुळे घेतला होता. ‘गेट केन’ पद्धतीनं का होईना पण तिच्या वडिलांना तिच्या लग्नासाठी कर्ज उपलब्ध होत नव्हतं... नापिकीमुळे पुरेसं उत्पन्नही नव्हतं. गेटकेन पद्धतीनं विवाहासाठी फार खर्च यायला नको होता... पण, समाजात होणारी ‘देवाण-घेवाण’च्या बाजारानं तिच्या जिवाला घोर लावला होता... कदाचित त्यातूनच मुलगी म्हणजे ‘बापावरचं ओझं’ ही भावना तिच्या मनात घर करून राहिली... आणि तिनं जे करायला नको होतं तेच केलं... आपल्या ‘बापावरचं ओझं’ तिनं एकदाच उतरवून टाकलं... कायमचं... शितल ही या अनुभवातून जाणारी एकटी मुलगी असूच शकत नाही... अनेक मुली समाजाच्या अदृश्य भिंतींवर आपटून जखमी झाल्या असतील... काही जणी त्यातच घुसमटतात... तर काही या सगळ्यांना धुडकावून लावत जगण्यासाठी वेगळा पर्याय शोधतात.

बऱ्याच ठिकाणी लग्नाचा सगळा खर्च, बस्त्याचा खर्च, दागिने, सांसारिक उपयोगाच्या वस्तू (चमचापासून गाड्यांपर्यंत) या सगळ्या गोष्टींचा खर्च मुलीकडच्या कुटुंबाकडे ढकललेला असतो... सोयीस्कारपणे हाच तर रितीरिवाज, मान-पान आहे, असं सांगत... या वस्तू म्हणजे हुंड्याचाच एक प्रकार आहे, हे न कळण्याइतके बाळबोध नसलेली लोकही त्याला पाठिंबा देतात.... जेव्हा एखाद्या मुलीकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे हुंड्याची मागणी केलेली असते... तेव्हा अनेकदा तो आपला ‘जन्मसिद्ध हक्कच’ आहे अशा अविर्भावात ती मागणी रेटली जाते... हा अधिकार त्या व्यक्तींना कुणी दिला? हा अधिकार त्या व्यक्तींना समाजानं म्हणजे आपणच दिलाय की... बरं या सगळ्या देव-घेवीच्या प्रकरणात मुलींना बोलण्याची किंवा त्यांचं मत विचारात घेण्याची फारशी तसदी घेतली जात नाही. लग्नाआधी बापावर आणि लग्नानंतर नवऱ्यावर मुली अवलंबून असतात किंबहुना त्यांनी तसंच असावं, हा पुरुषसत्ताक पद्धतीचा पगडा डोक्यात असतोच. ग्रामीण भागांत तर उच्च शिक्षण घेण्याची संधी मुलींना क्वचितच मिळालेली असते. ‘निर्णयक्षमता’ या शब्दाचा अर्थही अनेकांना / अनेकींना ठाऊक नसतो.

आजची गोंधळलेली पिढी...

आजची पिढी बरीच गोंधळलेली, भांबावलेली आहे असं लोक म्हणतात... हो आहे ना... कारण त्यांच्यासमोर   पुस्तकातली तत्त्व आणि जगण्यातली तत्त्व वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येतात... तुमच्या आजू-बाजूला वावरणाऱ्या प्रत्येकाचं विश्वं वेगळं असतं, अनुभव वेगळे असतात, त्या अनुभवानंतर वागण्याची पद्धत, विचारसरणी वेगळी असते... आणि मग हीच जगण्याची पद्धत अनेकदा तत्त्वं म्हणून मांडली जातात... अर्थातच, प्रत्येकाला जगण्यासाठी आपापली तत्त्व ठरवावी लागतात... ज्यांना ते ठरवता येत नाहीत ते निराशेत बुडून जातात. ‘निर्णयक्षमता’ हा इथं महत्त्वाचा भाग ठरतो. तुम्हाला कसं जगायचंय? हे तुम्हाला ठरवायचं असतं... शितलसारख्या मुलींकडे ही निर्णयक्षमता नसते असं नाही... पण, तिचा हा अधिकार ‘समाज’ तिला सहज देतो का?

‘धमक’ तर हवीच... जगायलाही!

शितलसारख्या अनेक मुलींना एक कळकळीची विनंती... आत्महत्या हा कोणत्याच प्रश्नावरचा कायमचा उपाय ठरू शकत नाही. आत्महत्येनंतर लोक हळहळण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत... जीव संपवायलाही हिंमत लागतेच की... तीच धमक जगण्यात दाखवा... तीच हिंमत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी वापरा… मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वापरा... तुम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर बरेचसे प्रश्न सहजच सुटून जातात. प्रत्येक वेळेस तुम्हाला कुटुंबीयांचा, समाजाचा पाठिंबा मिळेल असं होणार नाही... स्वत:चे निर्णय स्वत: घ्या, चुकला निर्णय तर चुकला... परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा.. कारण त्या चुकांमधून मिळणारा आत्मविश्वास तुमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.  

कशी बदलणार समाजाची मानसिकता...

एक व्यक्ती समाजाची बुरसटलेली विचारसरणी बदलू शकत नाही... एखादी संघटनाही या क्षेत्रात काम करत असेल तर तीदेखील सगळ्यांपर्यंत पोहचू शकणार नाही... कारण, उघडपणे विरोध झाला तर हे व्यवहार छुप्या पद्धतीनंही सुरूच असतात. समाजाचा एक अदृश्य गट लोकांच्या डोक्यावर बसलेला असतो... बऱ्याचदा आर्थिक सक्षमता असेल तर अशी कुटुंब यातून सहजगत्या मार्ग काढू शकतात. पण, एखाद्या पिचलेल्या शेतकरी, मजूर, कामगाराची मात्र यातून मार्ग काढताना दमछाक होते. गावगुंडी, वाळीत टाकण्याची भीती, काम न मिळण्याची भीती... अशा त्याच्यासाठी कितीतरी मोठ्या असणाऱ्या ओझ्याखाली त्याला मान झुकवावीच लागते. तीच गत त्यांच्या मुलांची... खरं वाटत नसेल तर आजही गावात जाऊन पाहा, उच्चभ्रूंची आणि कनिष्टांची (जातीपातींच्या लेबलासकट) वस्ती वेगळी दिसेल... पण, हा एखाद्या ठराविक जातीचा प्रश्न आहे, असं मला अजिबात वाटत नाही... हा प्रश्न आहे ‘किळसवाण्या मानसिकतेचा’

 ‘गेटकेन’ विवाह

शितलनं तिच्या पत्रात ‘गेटकेन’ विवाहाचाही उल्लेख केलाय. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर हा शब्द इतर ठिकाणी फारसा प्रचलित नाही... ‘गेटकेन’ हा खरा तर ऊसासंदर्भात वापरला जाणारा शब्द... ऊसाच्या हंगामात ऊस कारखान्याचे सभासद नसलेल्या शेतकऱ्यांचाही ऊस खरेदी केला जातो... बाजारभावाप्रमाणे नव्हे तर अत्यंत कमी किंमतीत... कमी खर्चात कारखान्यांना उपलब्ध होणारा ऊस म्हणजे ‘गेटकेन ऊस’... तसंच कमी खर्चातलं लग्न म्हणजे ‘गेटकेन’ लग्न... कोणताही मान-पानआणि देवाण घेवाण न करता पार पडलेलं लग्न... असे लग्न ही आपल्या समाजाची गरज बनलीय. लोक मोठ्या थाटामाटानं, उधळपट्टी करत लग्न करतात म्हणून आपल्या घरातलंही लग्न थाटामाटानंच व्हायला हवं, हा अट्टहास... अहो, कमी खर्चातही तुम्हाला तुमच्या मुलीवरचं, जावयावरचं प्रेम व्यक्त करता येऊ शकतं की... 

सामुदायिक विवाह सोहळे...

ज्या भागांत या पद्धतींचं, प्रथा-परंपरांचं भूत लोकांच्या मानगुटीवर बसलंय तिथं सामाजिक दबाव कमी करण्याचा हा एक चांगला उपाय ठरू शकतो. सामुदायिक विवाह सोहळ्यांत, कमी खर्चात लग्न पार पडली म्हणून काही कुणाचा मान, प्रतिष्ठा कमी होत नाही, हे बिंबवण्याचा प्रयत्न दीर्घकाळ सुरूच ठेवावा लागेल. ग्रामीण भागात काम करणाऱ्या एनजीओ यासाठी पुढाकार घेऊ शकतात. 

सॉरी, व्यक्त व्हायला वेळ घेतल्याबद्दल...

मी खरं तर अशा एका पिढीचं प्रतिनिधित्व करतेय जी लहानाची मोठी तर शहरात झालीय पण आमच्या अगोदरच्या पिढीची पाळंमुळं गावात घट्ट रुजलीत...पत्रकार असल्यानं मी ज्या वातावरणात वावरते ते वातावरण बरंचसं मोकळं आहे... त्यामुळे, पिढ्यांच्या विचारांत असलेली दरी आणखीनच मोठी वाटायला लागते. कधी तरी जुळवून तर कधी तरी कधी हट्टानं, परिणामांची पर्वा न करता आपलेल्या न आवडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्याच लोकांशी भांडणारी... स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची आणि त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी असणारी... माझा अनुभव 'रोखठोक' या कार्यक्रमातून मांडण्याची संधी मला मिळाली... (खाली व्हिडिओ जोडलेला आहे) पण एक सांगावसं वाटतंय... मी एक पत्रकार नसते तरी कायदेशीर मार्गानं माझा लढा सुरूच राहिला असता... आपले हक्क मिळवण्यासाठी आपल्या ठराविक ‘डेजिग्नेशन’ची आवश्यकता लागत नाही. 

चॅनलवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना बरेच लिमिटेशन्स असतात... त्यामुळे, अनेक गोष्टी फारशा चांगल्या पद्धतीनं टीव्हीवर मांडता आल्या नाहीत... त्यामुळेच इथे त्या जरा सविस्तर पद्धतीनं मांडतेय… व्यक्त व्हायला बराचसा वेळ घेतला, त्याबद्दल क्षमस्व...