मुंबई : हिंदू संस्कृतीत विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो. या विवाहात अनेक सोहळे असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे. एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते.
विवाहाच्या दिवशी जेव्हा वर वरात घेऊन वधूच्या घरी येतो तेव्हा सोहळ्यात त्याला वरमाला हातात दिली जाते. सुंदर फुलांनी ही वरमाला बनवण्यात आलेली असते. यातील फुलांचा अर्थ म्हणजे वधू-वर या दोघांचे जीवन हसत खेळत आणि आनंदाने भरलेले असावे.
वरमालातील फुले सुगंधित असतात. हे शुभ आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते. या सोहळ्यात वधू-वर एकमेकांना वरमाला घालतात. याचा अर्थ वधू आणि वर यांच्या जीवनात वैचारिक समानता राहील तसेच संतुलन कायम राहील.
वरमाला घालण्याचा हा सोहळा किती जुना आहे याबाबत ठोस माहिती मिळालेली नाहीये. मात्र प्राचीन ग्रंथात अनेक विवाह सोहळ्यांमध्ये या विधीचा उल्लेख आढळतो.
जेव्हा सीताचे स्वयंवर झाले होते तेव्हाच्या प्रसंगातही हा उल्लेख येतो की, जे कोणी ते शिवधनुष्य तोडेल त्याच्या गळ्यात वरमाला घालेल. याचाच अर्थ वरमाला घालणे म्हणजे वराचा स्वीकार करणे होय.