www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रेम आणि पाप... तुम्ही म्हणाल काय संदर्भ एकमेकांचा? पण, एखाद्या गोष्टीवर तुमचं अतोनात प्रेम आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही चुकीच्या मार्गांचा वापर केला तर या दोन्ही गोष्टींचा संगम नक्की होतो.
माणसाच्या मनात कळत नकळत ब-याचदा प्रेम आणि पाप या दोन संकल्पनांवर एकाचवेळी विचार सुरू असतो. खून, चोरी, फसवणूक या कायद्यानं गुन्हा ठरवलेल्या गोष्टींमध्ये पाप आहे तर वैयक्तिक व सामाजिक स्तरावरील भावनिक ओलावा, तळमळ, दुसऱ्याचं भलं होण्याची भावना अशा सकारात्मक भाव-भावनांचा गोफ म्हणजे ‘प्रेम’. वैयक्तिक प्रेमाचा विचार करता, कुटुंबातील व्यक्तिव्यतिरिक्त इतरांवरही आपण प्रेम करतो. यात मित्रमैत्रिणी, आवडता नट/नटी यांचा समावेश असतो. व्यक्तीसोबतच जेव्हा प्रेम एखाद्या निर्जिव वस्तूवर किंवा पैशांवर असतं तेव्हा त्याला लोभ म्हटलं जातं. लोभी मनुष्य आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.
आपला सहचर सोडून दुसऱ्या कोणा व्यक्तीवर प्रेम बसणं, हे पाप असतं का? आधुनिक पिढीसाठी हा प्रश्न अत्यंत जटिल असा आहे. या प्रश्नाचं उत्तर हे माणसा-माणसानुरूप भिन्न असू शकतं. पण तरीदेखील कायद्यानं आणि नात्यानं आपण ज्यांना बांधील आहोत, त्यांच्या वाट्याचं प्रेम हे दुसऱ्यांना देता येत नाही.
प्रेमासाठी पाप करू नये आणि पापावर प्रेम करू नये. सर्व समस्यांचं उत्तर जेव्हा प्रेम होऊ पाहतं, तेव्हा पापाला अटकाव घालण्यास आपल्याला वाव असतो. प्रेम जेव्हा समस्यांचं उत्तर बनतं, तेव्हा ते नक्कीच व्यापक होत जातं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.