www.24taas.com, मुंबई
बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या ‘बंद’बाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट केल्यानंतर तिला आणि लाईक करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली. ही कायदेशीर केलेली कारवाई योग्यच असल्याचे सांगून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटकेचे समर्थन केले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशाचे, महाराष्ट्राचे मानबिंदू होते. त्यांच्या निधनानंतर जो बंद पुकारला तो शिवसेनेने पुकारला नाही, तो जनसामन्यांचा उत्स्फूर्त बंद होता. अशा बंदला विरोध करून शिवसेनेच्या आणि जनतेच्या भावना भडकवणं, हा एकप्रकारे गुन्हा आहे. त्यामुळे त्याला जर कायद्याने कारवाई झाली असेल तर ती योग्य आहे.
दरम्यान, सोशल नेटवर्किंग साइटवर आता यापुढे पोस्ट करणार नाही, असे सांगून जी फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे तिने सांगितले. या घटनेनंतर या दोघी खूप घाबरल्याचे पत्रकारांना माहिती देताना दिसून आले.
पालघरमधल्या धाडा हॉस्पिटलच्या तोडफोडप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आलीये. बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या बंदबाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट पोस्ट केली होती. तर दुस-या एका तरुणीनं त्या पोस्टला लाईक केलं होतं. या प्रकरणी ही तोडफोड कऱण्यात आली होती.
पालघरमधल्या काही लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तरुणींना विचारणा केली. त्याला संबधित तरुणींनी उद्धट उत्तर दिल्यानंतर नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. शिवाय तरुणींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबधित तरुणींना अटक केली.
दरम्यान, माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत रविवारी एका मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली होती. या दोघींवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. काल त्या दोघींना १५ हजार रुपयांचा जामिनावर सोडण्यात आले.
त्यांच्या सुटकेबरोबर त्यांच्यावरील आरोपही पोलिसांनी मागे घेतले. त्याचवेळी या कारवाईच्या चौकशीचे आदेशही कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुखविंदर सिंह यांनी दिले. त्यामुळे पोलिसांत आता करायचे काय, असा प्रश्न आहे.
या घटनेबाबत दूरसंचार आणि सूचना मंत्री कपिल सिब्बल यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचा यासाठी उपयोग करण्याची गरज नव्हती, असे सिब्बल यांनी म्हटलंय.