www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
पोलीस भरतीच्या वेळी डोमिसाईल जमा करावंच लागेल, मराठी मुलांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन अतिरिक्त पोलीस आयुक्त जावेद अहमद आणि प्रशिक्षण विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिलंय.
शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी यासंदर्भात या दोघांची भेट घेतली. पोलीस भरतीमध्ये डोमिसाईल देणं आता बंधनकारक नसल्याचं वृत्त ‘झी २४ तास’नं काल सर्वप्रथम दिलं होतं. यामुळे परप्रांतियांना पोलीस शिपाई भरतीत रेड कार्पेट अंथरलं जाण्याची शक्यता होती. यामुळे मनसेनं आंदोलन केलं होतं. ‘झी २४ तास’नं या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर मराठी मुलांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांना द्यावं लागलंय.
पोलीस भरतीच्या वेळी महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या अधिवासाच्या पुराव्याच्या प्रमाणपत्राची अट यापूर्वी उमेद्वारांना पूर्ण करावी लागत होती. त्यामुळं पोलीस दलात महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या उमेदवारांनाच भरती होता येत होतं. आता ही अटच रद्द करण्यात आल्यानं परप्रांतीयांना पोलीस भरतीत ‘रेड कार्पेट’ टाकल्याची भावना निर्माण झाली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.