दहशतवादाचं औरंगाबाद-मराठवाडा कनेक्शन….

पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लागल्यावर, दहशतवाद्यांचं मराठवाडा कनेक्शन पुन्हा उघड झालंय. दिल्लीत पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा मराठवाड्याशी संबंध आहे तर असद खान हा औरंगाबादपासून जवळ असलेल्या नायगाव गावातील तवक्कल नगरमधला रहिवासी आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 12, 2012, 09:41 AM IST

www.24taas.com, पुणे
पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लागल्यावर, दहशतवाद्यांचं मराठवाडा कनेक्शन पुन्हा उघड झालंय.
दिल्लीत पुणे बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा मराठवाड्याशी संबंध आहे तर असद खान हा औरंगाबादपासून जवळ असलेल्या नायगाव गावातील तवक्कल नगरमधला रहिवासी आहे. तो पूर्वी या ठिकाणी रहात होता. औरंगाबादच्या एटीएस पथकानं त्याच्या घराची तपासणीही केलीय. मात्र, याबाबत काहीही बोलायला त्यांनी नकार दिला. असदच्या इथल्या घरात कुणीही राहत नाही. कित्येक दिवसांपासून हे घर बंद आहे. गावकरी सुद्धा याबाबत बोलायला तयार नाहीत. मात्र, परिसरातील वातावरणात तणाव असल्यामुळे पोलिसांनी थोडाबहूत बंदोबस्त ठेवलाय.

मराठवाड्यातल्या दहशतवादी कनेक्शनचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट
- संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कनेक्शनमुळं चर्चेत आलाय. मराठवाड्याचं पहिलं दहशतवादी कनेक्शन समोर आलं ते बीडच्या जबीउद्दीन अन्सारीच्या रुपानं... २००६ साली वेरूळजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला तेव्हा... या शस्त्रसाठ्याद्वारे देशात मोठ्या घातपाती कारवाया करण्याचा कट आखला गेला होता.

- वेरूळचा शस्त्रसाठा प्रकरणातला आरोपींपैकी एक फैय्याज कागजी हाही मूळचा बीडचा तो अजूनही फरारच आहे.
- अन्सारी नंतर मराठवाड्यात दुसरा मोठा दहशतवादी सापडाला तो इंडियन मुजाहीदीनचा दहशतवादी हिमायत बेग, हिमायत बेग म्हणजे पुणे बॉम्बस्फोटातला मूळ आरोपी.
- २००७ मध्ये बंगालमध्ये मूळचा बीडचा रहिवासी असलेला शेख नईम ऊर्फ समीरला सीमा सुरक्षा दलानं पकडलं.. ११ जुलैच्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींना शेख नईमनं मदत केल्याचं उघड झालं.
- २००७ ला हैदराबादच्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी बीडच्याच शोएब जहागीरदारला अटक करण्यात आली.
- औरंगाबादमध्ये शेख अब्रार एन्काऊन्टरमध्ये ठार झाला. अब्रार हा इंडियन मुजाहिदीनचा मोस्ट वॉंटेड आरोपी आणि रियाझ भटकळचा साथीदार.
- त्यानंतर ३१ ऑगस्ट २०१२ ला लष्कर-ए-तोयबा च्या चार संशयित दहशतवाद्यांना एटीएसनं नांदेडहून ताब्यात घेतलं.
विशेष म्हणजे गेल्या ६ वर्षात बीड जिल्ह्यातून गायब झालेल्या तरुणांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे.