www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबादेतील महिला कॉन्स्टेबलच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी दोन सहायक पोलीस आयुक्तांवर बलात्काराचा तर एका एसीपीवर विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिलेत.
बलात्काराचा आरोप असलेल्या दोघांवर अटक वॉरंट, तर एकावर समन्स बजावण्याचे आदेश कोर्टानी दिलेत. शहर पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याची तक्रार स्वत: पीडित कॉन्स्टेबलनं पोलिसांत केल्यानंतरही काहीही कारवाई झाली नाही, अशा आशयाची फौजदारी तक्रार पीडित महिलेनं कोर्टाकडे केली होती. याप्रकरणी कोर्टानं बुधवारी प्रथम दर्शनी गुन्हा नोंदवून घेतला असून सहायक पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे आणि किशन बहुरे या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ अन्वये बलात्काराचा तर नरेश मेघराजानी यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. भाजीभाकरे आणि बहुरे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
प्रथमदर्शनी हे प्रकरण गंभीर असल्याने प्रथम न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी गुन्हा करीत आणि वॉरंट काढण्याचे आदेश दिल्याची माहिती पीडित महिलेच्या वकीलांनी म्हटलंय. भाजीभाकरे आणि बहुरे यांना संबंधित पोलिसांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावं लागणार आहे. दुसरीकडे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या आदेशानं पोलीस उपायुक्त डॉ. जय जाधव या प्रकरणाची चौकशी करत आहेत.