राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले?

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अवघ्या ८ महिन्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली. नेदरलँडला ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर केंद्रेकरांना पुन्हा रुजू न होण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

Updated: Feb 20, 2013, 02:12 PM IST

www.24taas.com, बीड
बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अवघ्या ८ महिन्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली. नेदरलँडला ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर केंद्रेकरांना पुन्हा रुजू न होण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. अवघ्या ८ महिन्यांत केंद्रेकरांनी जिल्ह्यातली टँकर लॉबी मोडीत काढली. तसंच वाळू माफिया, आरटीओ कार्यालयातला दलालांचा विळखा, बीड, माजलगावची अतिक्रमणं मोडीत काढली होती.
त्यामुळे केंद्रेकर यांच्या विरोधात बीडच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मोर्चेबांधणी केल्याचा आरोप केला जातो आहे. राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकल्याचं यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. चारा घोटाळा थांबविण्यासाठी केंद्रेकर यांनी कंबर कसली होती. तसंच सेतू कार्यालयातल्या भ्रष्टाचारालाही त्यांनी लगाम घातला. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे होणाऱ्या राजेशाही लग्नसोहळ्यांमुळे आपल्याला झोप आली नाही, असं पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. आता आपल्या नेत्यांनी केलेला हा राजकीय हस्तक्षेप बघितल्यावर त्यांना झोप येणार का? हा प्रश्नच आहे.

दरम्यान, या बदलीविरोधात बीडमध्ये संताप असून उद्या बीड जिल्हा बंदची हाक नागरिकांनी दिली आहे. एकूणच दुष्काळी जिल्ह्यांत आपल्या जिल्ह्याचा समावेश असावा, यासाठी राष्ट्रवादीनं लॉबिंग केल्याचं यापूर्वी उघड झालं आहे. आता या वाढीव निधीचा `सदूपयोग` करण्यासाठी चढाओढ लागलेली असताना त्यात केंद्रेकरांची आडकाठी नको, म्हणून तर हा खटाटोप केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.